नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने कॅनडातील कुख्यात दहशतवादी अर्शदीप डल्लाच्या सहकाऱ्यांना अटक केली आहे. अटकेतील दहशतवादी जगजीत सिंह (उत्तराखंड) तसेच नौशदने (जहांगीरपुरी, दिल्ली) दिलेल्या माहितीच्या आधारे श्रद्धानंद कॉलोनी तसेच भलस्वा डेरी स्थित ठिकाणांवर पोलिसांनी धाडी टाकल्या. यावेळी दोन हॅण्ड ग्रॅनेड हस्तगत केले आहे.पोलिसांनी शुक्रवारी रात्रभर आरोपींच्या दिल्लीतील अनेक ठिकाणांवर धाडी टाकल्या. श्रद्धानंद कॉलनीतील आरोपींच्या घरातून रक्ताचे काही नमूने मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी आरोपींना १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले होते. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंजाब, उत्तराखंड तसेच उत्तर प्रदेशात धाडी घातल्या.आरोपींनी पंजाबमधील अनेक धार्मिक गुरू तसेच नेत्यांच्या हत्येची योजना आखली होती. आरोपींनी यासंदर्भात पोलिसांना कबुली दिली आहे. योजनेनुसार आरोपींपर्यंत हत्यारे पोहोचली होती. अर्शदीपच्या सांगण्यावरूनच धार्मिक नेत्यांच्या हत्येचा कट आखल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
दहशतवाद विरोधी (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) नुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जहांगीरपुरीतील त्यांच्या ठिकाणांवर धाड टाकरण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. २६ जानेवारीपूर्वी धार्मिक नेत्यांच्या हत्या करण्याचा कट आरोपींनी आखला होता. गुरूवारी दोघांना पोलिसांनी अटक केली होती. नौशद दहशतवादी संघटना हरकत-उल-अंसार चा सदस्य होता. आरोपींकडून तीन पिस्तूल तसेच २२ काडतून हस्तगत करण्यात आले आहेत. तर, अर्शदीप खालिस्तान टास्क फोर्सचा (केटीएफ) दहशवादी असून दोन दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने त्याला दहशतवादी घोषित केले आहे.