PM Narendra Modi : ‘ग्राउंडवर्क आणि सोशल मीडियावर फोकस करा’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

PM Narendra Modi : ‘ग्राउंडवर्क आणि सोशल मीडियावर फोकस करा’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Elections 2024) तयारी सुरू केली आहे. संसदेच्या नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनानंतर पंतप्रधान मोदींनी भाजप खासदारांसोबत अल्पोपहार बैठक घेतली. बैठकीत, पंतप्रधानांनी खासदारांना सध्याच्या काळात सोशल मीडिया आणि डिजिटल प्रेझन्सचे महत्त्व समजावून सांगितले.

राज्यसभेत भाजपचे 92 खासदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राज्यांनुसार खासदारांना बैठकीसाठी बोलावले होते. सोशल मीडियावर त्यांचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी आणि मतदारांना गुंतवून ठेवण्यासाठी त्यांनी खासदारांना तळागाळात जोमाने काम करण्यास सांगितले. राज्यसभेत पक्षाच्या खासदारांना लोकांना जोडण्यावर विशेष लक्ष द्या, असे सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) राज्यसभा खासदारांना म्हणाले, ‘पक्षाने दिलेल्या क्षेत्राच्या जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही सक्रियपणे सहभागी व्हा. तुमचे काम उत्साहवर्धक असले पाहिजे. त्यांना नेमून दिलेल्या भागात नियमित भेटी देणे फायदेशीर ठरेल. परिसरातील आपली भेट स्थानिक लोकांच्या मनात घर करुन गेली पाहिजे.

लोकांचा सरकारवरील विश्वास वाढवा

या सोबतच केंद्राने दिलेल्या कामांना जोरात चालना देण्याचा आग्रह पंतप्रधानांनी धरला. जेणेकरून लोकांचा सरकारवर विश्वास वाढेल. खासदारांना नेहमी संसदेत उपस्थित राहून वादविवाद आणि चर्चेसाठी तयार राहण्यास सांगितले आहे.

या ठिकाणांना भेटी देण्याच्या सूचना खासदारांना दिल्या 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना पंतप्रधानांचे संग्रहालय, काशी आणि महाकाल कॉरिडॉर, स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली की नाही, असा सवाल केला. पंतप्रधान म्हणाले की, जर खासदारांनी येथे भेट दिली नाही तर त्यांनी तसे करावे आणि आपल्या भागातील लोकांनाही येथे भेट देण्यासाठी प्रोत्साहित करावे. या ऐतिहासिक ठिकाणी लोकांसाठी सहली आयोजित करा.

G20 कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक सहभाग निश्चित करा

भारताला डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण वर्षासाठी G20 चे अध्यक्षपद मिळाले आहे. या एका वर्षात देशातील 55 हून अधिक शहरांमध्ये 600 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ही देशासाठी अभिमानची बाब असून पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सामान्य लोकांना या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा.


अधिक वाचा :

Back to top button