Uddhav Thackeray | ठाकरे गटासमोर नवा पेच : उद्धव ठाकरे यांची पक्ष प्रमुखपदाची मुदत संपणार

Uddhav Thackeray | ठाकरे गटासमोर नवा पेच : उद्धव ठाकरे यांची पक्ष प्रमुखपदाची मुदत संपणार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरुन सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरु असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पक्ष प्रमुखपदाची मुदत २३ जानेवारी रोजी संपत आहे. यामुळे ठाकरे गटासमोर आणखी एक पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, पुन्हा कार्यकारिणी बैठक घेऊन संघटनात्मक निवडणुकांसाठी शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे विनंती करण्यात आलेली असल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते खा. अनिल देसाई यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

सत्ता संघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दिवसेंदिवस लांबतच चालली आहे. न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी १४ फेब्रुवारी ही तारीख दिली आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात सुनावणी सुरु आहे. येत्या २३ जानेवारीरोजी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पक्ष प्रमुखपदाची मुदत संपणार आहे. त्यामुळे संघटनात्मक निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडे विनंती करण्यात आली आहे, असे अनिल देसाई यांनी नमूद केले.

सन २०१८ मध्ये एकसंध शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत उद्धव ठाकरे यांची पक्ष प्रमुख म्हणून निवड झाली होती. निवडणूक आयोगासमोर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाकडून हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न झाला होता, असे समजते. दुसरीकडे शिंदे गटाने आयोगासमोर आपली बाजू मांडताना पक्षप्रमुख हे पदच घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद केला होता.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्ष प्रमुखपदाला कोणी आक्षेप घेतला नाही. फूट होण्याआधी पक्षाकडून शिंदे गटातील लोकांना एबी फॉर्म देण्यात आला होता, त्यावेळी कसलेही आढेवेढे घेतले गेले नाहीत, असे देसाई यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

logo
Pudhari News
pudhari.news