हरियाणातील Jalebi Babaला दणका, १०० हून अधिक महिलांवर बलात्‍कार करुन व्‍हिडिओ क्लिप बनविल्‍याचा होता आरोप | पुढारी

हरियाणातील Jalebi Babaला दणका, १०० हून अधिक महिलांवर बलात्‍कार करुन व्‍हिडिओ क्लिप बनविल्‍याचा होता आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : शंभरहून अधिक महिलांवर बलात्‍कार करुन सेक्‍स व्‍हिडिओ क्लिप बनवल्‍यापकरणी हरियाणातील स्‍वयंघोषित अध्‍यात्‍मिक गुरु अमरपुरी ऊर्फ ‘जलेबी बाबा’ याला न्‍यायालयाने १४ वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हरियाणाच्‍या फतेहाबाद येथील जलदगती न्यायालयाने (फास्ट ट्रॅक) हा निकाल दिला. ( Jalebi Baba )

Jalebi Baba : तब्‍बल १२० कथित व्हिडिओ क्लिप जप्त

अमरपुरी ऊर्फ ‘जलेबी बाबा’ हा महिलांना त्‍यांच्‍या व्‍यक्‍तिगत जीवनातील विविध समस्‍या सोडविण्‍याचे आमिष  दाखवत असे. या आमिषाला बळी पडलेल्‍या महिला त्‍याच्‍या आश्रमात जात असत. समस्‍या सोडविण्‍याच्‍या बहाण्‍याने तो महिला व अल्‍पवयीन मुलींना अंमली पदार्थ देत असे. अंमली पदार्थामुळे शुद्ध हरपलेल्‍या महिला व अल्‍पवयीन मुलींचे त्याने लैंगिक शोषण करत असे. या कृत्‍याचे त्‍याने  व्‍हिडिओ क्लिप बनवल्‍या. या व्‍हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्‍हायरल करण्‍यची धमकी देत तो पीडित महिला व मुलींना पैशांसाठी ब्‍लॅकमेल करत असे. हरियाणा पोलिसांनी २०१८ मध्ये त्‍याला फतेहाबादच्या टोहाना शहरातून अटक केली. त्याच्या मोबाइल फोनमधून १२० कथित सेक्स व्हिडिओ क्लिप जप्त केल्या होत्‍या. या कारवाईने संपूर्ण हरियणात खळबळ माजली होती.

पॉस्‍को कायदान्‍वये झाली होती कारवाई

६३ वर्षीय अमरपुरी उर्फ ‘जलेबी बाबा’ याच्‍यावर १०० हून अधिक महिला व दोन अल्‍पवयीन मुलींवर बलात्‍कार केल्‍याचा आरोप होता. अल्‍पवयीन मुलींवर दोनवेळा बलात्‍कार केल्‍याप्रकरणी त्‍याच्‍यावर लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदान्‍वये ( पॉस्‍को) गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. त्‍याला अटक करण्‍यात आली. न्‍यायालयाने त्‍याला ५ जानेवारी २०२३ रोजी या प्रकरणी दोषी ठरवले होते.

अतिरिक्‍त जिल्‍हा न्‍यायाधीश बलवंत सिंग यांनी पॉस्‍को कायद्यातील कलम ६ अन्वये १४ वर्षांचा तुरुंगवास, कलम ३७६ अन्वये दोन बलात्कार प्रकरणात प्रत्येकी ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर शस्त्रास्त्र कायद्याच्या खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात केली आहे, अशी माहिती पीडितांचे वकील संजय वर्मा यांनी माध्‍यमांशी बोलताना दिली. न्‍यायालयाने शिक्षा सुनावल्‍यानंतर ‘जलेबी बाबा’ न्‍यायालयाचा धाय माकलून रडला. निकालावेळी जलेबी बाबाच्‍या अत्‍याचाराला बळी पडलेल्‍या सहा पीडित महिला न्यायालयात उपस्‍थित होत्‍या. पीडितांच्या जबाबाच्या आधारे न्यायालयाने हा निकाल दिल्‍याचेही पीडितांच्‍या वकिलांनी सांगितले.

असा झाला होता जलेबी बाबाच्‍या घृणास्‍पद कृत्याचा पर्दाफाश

टोहना पोलीस ठाण्‍याचे तत्‍कालिन पोलीस निरीक्षक प्रदीप कुमार यांना एका खासगी गुप्‍तहेराने ‘जलेबी बाबा’चा कथित सेक्‍स व्‍हिडिओ दाखवला. यानंतर महिला व मुलींच्‍या लैंगिक शोषणाचा धक्‍कादायक घटना उघडकीस आली होती. यानंतर पोलिसांनी स्‍वयंघोषित अध्‍यात्‍मिक गुरु अमरपुरी उर्फ ‘जलेबी बाबा’ याच्‍यावर भारतीय दंड संहितेमधील ( आयपीसी )कलम 292, 293, 294, 376, 384, 509 आणि आयटी कायद्याच्या कलम 67-ए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा :

 

 

Back to top button