नगर : धक्कादायक ! अल्पवयीन मुलीचे लग्न लावून भीक मागण्यासाठी पाठविले

नगर : पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीचे अल्पवयीन मुलाबरोबर बळजबरीने लग्न लावून नंतर मुलीचे केस कापून तिला भीक मागायला लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बळजबरीने लग्न लावणार्या मौलानासह मुलीचे आई-वडील, सासू-सासरा अशा 5 जणांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बालविकास प्रकल्प अधिकारी भागीरथी सदाशिव बहिरवाडे यांनी फिर्याद दिली आहे.
स्नेहालयच्या पुढाकारातून ही कारवाई करण्यात आली आहे. तेरा वर्षीय मुलगी शहरातील एका भागात कुटुंबासह वास्तव्यास आहे. पीडितेच्या घराजवळच तिचे मामा राहवयास असून त्यांच्या 16 वर्षिय मुलाशी 22 मे 2022 रोजी बळजबरीने एका मौलानाच्या उपस्थितीत लग्न लावण्यात आले. यावेळी मुलीचे वय कमी आहे, असे मुलीच्या आईने सांगितले असतानाही बळजबरीने लग्न लावण्यात आले. त्यानंतर अल्पवयीन मुलाने मुलीशी शरीरसंबंध ठेवले. लग्न लावून दिल्यानंतर दहा-बारा दिवसांनी 10-12 दिवसांनी सासू-सासर्याने केस कापून मुलीला मशिदीजवळ भीक मागण्यासाठी पाठविले. तोफखाना पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.