देशातून आतापर्यंत 16.92 लाख टन साखरेची निर्यात; शुगर ट्रेड असोसिएशनची माहिती (Sugar Export) | पुढारी

देशातून आतापर्यंत 16.92 लाख टन साखरेची निर्यात; शुगर ट्रेड असोसिएशनची माहिती (Sugar Export)

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: चालू ऊस गळीत हंगामात आतापर्यंत 16.92 लाख टन साखरेची निर्यात (Sugar Export) झाली असल्याची माहिती ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनकडून मंगळवारी देण्यात आली. निर्यातीच्या आकड्यांमध्ये चीनला करण्यात आलेल्या 59 हजार 596 टन साखरेचाही समावेश आहे. आशियाई देशांमध्ये प्रामुख्याने बांगला देश आणि श्रीलंकेला साखरेची निर्यात करण्यात आली असून वरील दोन्ही देशांना क्रमशः 1.47 लाख आणि 82 हजार 462 टन साखरेची निर्यात करण्यात आली आहे.

ऊस-साखरेचा हंगाम ऑक्टोबर ते सप्टेंबर या कालावधीसाठी असतो. चालू साखर हंगामात मे महिन्यापर्यंत साठ लाख टन साखरेची निर्यात (Sugar Export) करण्याची परवानगी केंद्र सरकारने कारखान्यांना दिलेली आहे. 1 ऑक्टोबर 2022 ते 4 जानेवारी 2023 या कालावधीत कारखान्यांनी एकूण 16.92 लाख टन साखरेची निर्यात केली असल्याचे शुगर ट्रेड असोसिएशनकडून सांगण्यात आले. 3.47 लाख टन साखर लोडिंग प्रक्रियेत असून 2.54 लाख टन साखर प्रक्रियादारांना सुपूर्द करण्यात आले असल्याचेही असोसिएशचे म्हणणे आहे.

ज्या देशांना सर्वाधिक साखर निर्यात करण्यात आली आहे. त्यात सोमालिया अग्रस्थानी आहे. या देशाला 1.70 लाख टन साखर निर्यात झाली आहे. त्यापाठोपाठ संयुक्त अरब आमिरातीला 1.69 लाख टन, दिजिबुतीला दीड लाख टन आणि सुदानला 1.37 लाख टन साखर निर्यात करण्यात आली आहे. याशिवाय मलेशियाला 1.36 लाख टन, इंडोनेशियाला 1.18 लाख टन, सौदी अरेबियाला 1.08 लाख टन साखरेची निर्यात झाली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button