Fixed Deposite : मुदत ठेव व्याजदर तीन वर्षांनी प्रथमच 8 टक्के

Fixed Deposite : मुदत ठेव व्याजदर तीन वर्षांनी प्रथमच 8 टक्के
Published on
Updated on

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मुदत ठेवीच्या (Fixed Deposite) व्याजावर खर्चाचे नियोजन करणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांत प्रथमच एफडीसाठी 8 टक्के व्याज मिळत आहे. यामुळे अनेक ज्येष्ठांनी मागील काळात केलेल्या एफडी (Fixed Deposite) मोडून नव्या व्याजदराचा लाभ घेण्यासाठी नव्याने गुंतवणे सुरू केले आहे. रिझर्व्ह बँकेने केलेल्या व्याजदर वाढीचा हा परिणाम आहे.

कोरोनाच्या काळात एफडीच्या व्याजदरात कपात करण्यात आली होती. या काळात व्याजदर 5.5 टक्के एवढा घटला होता. याच काळात अनेक ज्येष्ठांनी दोन ते तीन वर्षांसाठी एफडीमध्ये (Fixed Deposite) रक्कम गुंतवली होती; पण आता लागोपाठ दोनवेळा रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केल्यानंतर बहुतांश बँकांनी एफडीचे व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे सध्या जुन्या एफडी मोडून नव्या व्याजदराचा लाभ घेण्यासाठी नव्याने गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. खासगी बँकांनी एफडीवरील व्याजदर 8 टक्के केला आहे; तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा दर साडेसात टक्क्यांच्या आसपास गेला आहे.

केंद्राने गेल्या महिन्यात ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या व्याजदरातही वाढ करून तो दर 8 टक्क्यांवर आणला आहे. कोरोना काळात तो 7.4 टक्के होता. आता ही योजना आणि एफडी यांच्या व्याजदरात आता किरकोळ फरक राहिला आहे.

अतिज्येष्ठांसाठी विशेष योजना

बँकांनी आता ज्येष्ठ नागरिकांशिवाय अतिज्येष्ठ म्हणजे 80 वर्षांपेक्षा अधिक वय असणार्‍या नागरिकांसाठी विशेष एफडी जारी केल्या आहेत. युनियन बँक 700 दिवसांच्या ठेवीसाठी 8 टक्के व्याज देते; तर पंजाब नॅशनल बँकेने 666 दिवसांच्या ठेवींसाठी 8.1 टक्के व्याजदर जाहीर केला आहे.

व्याजदराच्या या स्पर्धेत आता बँकांशिवाय बिगर बँकिंग अर्थपुरवठा संस्थाही उतरल्या आहेत. एचडीएफसी सफायरने 7.6 टक्के व्याजाची ठेव योजना आणली आहे; तर बजाज फायनान्सनेही 7.95 टक्के व्याजाची योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आणली आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news