

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालय समलैंगिक विवाहाला (Same Sex Marriage) मान्यता देण्यासंदर्भातील सर्व याचिकांवर सुनावणी करणार आहे. देशातील विविध उच्च न्यायालयांमधील प्रलंबित खटले सर्वोच्च न्यायालयाने स्वत:कडे वर्ग केले आहेत. या मुद्द्यावर दाखल झालेल्या नव्या याचिकांवरही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून १५ फेब्रुवारीपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ मार्च रोजी होणार आहे.
समलैंगिक विवाहांना (Same Sex Marriage) कायदेशीर मान्यता देण्याच्या प्रकरणी शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीपूर्वी संयुक्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष जय भगवान गोयल आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाबाहेर प्रतिकात्मक निदर्शने केली.
सरन्यायाधीश डी. व्ही. चंद्रचूड यांनी आदेश नोंदवताना सांगितले की, एकाच विषयावर वेगवेगळ्या उच्च न्यायालयांसमोर अनेक याचिका प्रलंबित असल्याने, आम्ही या न्यायालयासमोरील सर्व याचिका हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. यासह, न्यायालयाने सर्व याचिकाकर्त्यांना आभासी व्यासपीठावर उपस्थित राहण्याची आणि त्यांचे सबमिशन पुढे नेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. जो कोणी मागेल, त्याला लिंक दिली जाईल. केंद्रीय यंत्रणांना नोटीस बजावली जाईल. प्रतिज्ञापत्र १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत दाखल करायचे आहे.
हेही वाचलंत का ?