Joshimath : उत्तराखंडमधील जोशीमठ खचले, ५०० घरांना तडे, रस्तेही दुभंगले; ६६ कुटुंबांचे स्थलांतर

Joshimath : उत्तराखंडमधील जोशीमठ खचले, ५०० घरांना तडे, रस्तेही दुभंगले; ६६ कुटुंबांचे स्थलांतर
Published on
Updated on

जोशीमठ; वृत्तसंस्था : उत्तराखंडमधील जोशीमठ हे गाव अचानक खचू लागले असून अनेक रस्ते भेगा पडून दुभंगले आहेत, तर 500 हून अधिक घरांना तडे गेले आहेत. भीतीपोटी 66 कुटुंबांनी गाव सोडले असले तरी अद्यापही 300 हून अधिक कुटुंबे जीव धोक्यात घालून तेथे राहत आहेत. या भागात असलेला आशियातील सर्वात मोठा रोप वेही बंद करण्यात आला आहे. (Joshimath)

बद्रीनाथचे प्रवेशद्वार, व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या जोशीमठ गावाची सध्या झोप उडाली आहे. गावाची जमीन खचू लागली असून हे गाव जमिनीच्या पोटात गडप होते की काय, अशी भीती निर्माण झाल्याने सगळीकडे भयाचे वातावरण आहे. पर्यटकांचा ओघही कमी झाला आहे. चहलपहल असणार्‍या या गावात सगळीकडे अस्वस्थ वातावरण आहे. छोट्या- मोठ्या रस्त्यांना तडे गेले असून काही भाग जमिनीत गडप झाला आहे. नगरपालिकेच्या सर्वेक्षणानुसार 566 घरांना तडे गेले असून यातील बहुतांश घरे राहण्यासाठी सुरक्षित राहिलेली नाहीत. पायाखालची जमीन कधी दुभंगेल सांगता येत नाही. (Joshimath)

ज्या ठिकाणी रस्त्यांना तडे गेले आहेत तेथे अचानक एका भागात उंचवटे तर दुसर्‍या भागातील रस्त्यांच्या जागी मोठाले खड्डे पडत आहेत. काही खड्ड्यांतून खळाळणार्‍या पाण्याचा प्रवाहदेखील वाहताना दिसत आहे. हा भाग भूकंपप्रवण असल्याने जमीन लवकर खचते. त्यात हे असे झपाट्याने होत असल्याने सगळे गावच खचते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. (Joshimath)

नगरपालिकेने पाहणी करून धोकादायक घरांची संख्या जाहीर केली. अशी 566 घरे आहेत. त्या लोकांना सुरक्षितस्थळी जाण्यास सांगितले आहे; पण आतापर्यंत फक्त 66 कुटुंबांनीच राहते घर सोडले आहे. इतर कुटुंबे घर सोडण्यास तयार नाहीत. तीन हजारांहून लोकांचे भविष्य टांगणीला लागले आहे.

हालचालींना वेग

जमीन खचत असल्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत झपाट्याने होत असल्याने प्रशासनाने हालचाली वेगवान केल्या आहेत. खुद्द मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी या भागाचा दौरा करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, पंतप्रधान कार्यालयाने या प्रकाराची दखल घेत अत्यावश्यक सूचना जारी केल्या आहेत. याशिवाय तज्ज्ञांच्या एका समितीने या प्रकाराची पाहणी करून आपला प्राथमिक अहवाल सादर केला आहे. त्यात निसर्ग आणि मानवनिर्मित कारणांमुळे हा प्रकार होत असल्याचे म्हटले आहे.

नोव्हेंबरमध्ये डोंगर खचण्यास प्रारंभ

नोव्हेंबर महिन्यापासून जोशीमठपासून जवळच असलेल्या औली या गावचा डोंगर खचण्यास प्रारंभ झाला. तेथे अचानक भूस्खलनाचे प्रकार वाढले. धरणासाठी खोदलेल्या बोगद्यामुळे हा प्रकार सुरू झाल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. जोशीमठ ते औली हा आशियातील सर्वात मोठा रोप वे आहे. या रोप वेच्या खांबांनजीकच्या जमिनीला तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. औली हे स्किईंगचे मोठे केंद्र मानले जाते. तेथे आगामी वर्षात दक्षिण आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धा होणार आहेत; पण भूस्खलनाचा वेग वाढला तर औली हे गावच नकाशावरून गायब होण्याची अभ्यासकांना भीती आहे.

जोशीमठचे महत्त्व

उत्तराखंडची राजधानी असलेल्या डेहराडूनपासून 300 कि.मी. अंतरावर असलेले जोशीमठ गाव अनेक बाबींसाठी महत्त्वाचे आहे. चार धाम यात्रेतील बद्रीनाथ या एका धामाचे हे प्रवेशद्वार आहे. येथील ज्योतिर्मय हिंदू मठ अत्यंत पावन स्थान समजले जाते. गिर्यारोहकांच्या अनेक मोहिमांसाठी जोशीमठ महत्त्वााचा टप्पा आहे. येथूनच बद्रीनाथ आणि व्हॅली ऑफ फ्लॉवरचे ट्रेक सुरू होतात. याशिवाय लष्कराच्या द़ृष्टीनेही जोशीमठ महत्त्वाचे असून चीन सीमेलगतची सर्वात मोठी लष्करी छावणी येथे आहे.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news