India vs Sri Lanka : संजू सॅमसन श्रीलंका विरुद्धच्या उर्वरित दोन टी-20 सामन्यांतून बाहेर, ‘या’ खेळाडूला संधी | पुढारी

India vs Sri Lanka : संजू सॅमसन श्रीलंका विरुद्धच्या उर्वरित दोन टी-20 सामन्यांतून बाहेर, 'या' खेळाडूला संधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिली लढत मुंबईत मंगळवारी झाली. या लढतीत भारताने २ धावांनी शानदार विजय मिळवला. मालिकेतील दुसरी लढत आज ५ जानेवारीला पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. टीम इंडियाचा फलंदाज संजू सॅमसनला श्रीलंका विरुद्धच्या उर्वरित T20I सामन्यांतून वगळण्यात आले आहे. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने संजू सॅमसनच्या जागी जितेश शर्माला संधी दिली असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिल्या T20 सामन्यादरम्यान सीमारेषेजवळ चेंडू पकडण्याचा प्रयत्न करताना सॅमसनच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला स्कॅन आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी मुंबईत नेले होते. त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. टीम इंडिया आज ५ जानेवारी रोजी पुण्यात श्रीलंकेविरुद्ध दुसरा T20 सामना खेळणार आहे.

संजू सॅमसनला बांगला देशविरुद्धच्या वन-डे मालिकेत संधी मिळाली नव्हती. त्यावरून जोरदार चर्चादेखील झाली होती. श्रीलंकेविरुद्ध संधी मिळाल्यावर मात्र तो अपयशी ठरला. त्यामुळे दुसर्‍या टी-20 लढतीत संजूच्या जागी जितेश शर्माला संधी दिली आहे.

पुण्यातील दुसर्‍या लढतीत विजय मिळवून भारत मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. मुंबईतील पहिल्या लढतीत भारताने अखेरच्या चेंडूवर रोमांचक विजय मिळवला होता. या सामन्यात भारताचे आघाडीचे फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव फक्त ७ धावांवर माघारी परतले. संजू सॅमसनला ५ धावा करता आल्या.

श्रीलंका विरुद्धच्या T20 साठी भारताचा संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार. (India vs Sri Lanka)

हे ही वाचा :

Back to top button