पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : पिस्तूल दाखवून तुरुंग अधिकाऱ्याला धमकाविल्याच्या प्रकरणात उत्तर प्रदेशचा माजी आमदार मुख्तार अन्सारी याला अलाहाबाद उच्च न्यायालयाने सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला अंतरिम स्थगिती देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज ( दि. २) घेतला. दुसरीकडे न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला नोटीस जारी करीत आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.
सन 2003 मध्ये मुख्तारने तुरुंग अधिकाऱ्याला पिस्तूल दाखवून धमकाविले होते. त्याच्यावरील हा गुन्हा सिध्द झाल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मुख्तारने शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने याचिकेची सुनावणी करताना या शिक्षेला अंतरिम स्थगिती दिली.