Protected National Monuments : देशातील ५० संरक्षित राष्ट्रीय स्मारकांचा थांगपत्ता नाही; सांस्कृतिक मंत्रालयाची संसदेत माहिती | पुढारी

Protected National Monuments : देशातील ५० संरक्षित राष्ट्रीय स्मारकांचा थांगपत्ता नाही; सांस्कृतिक मंत्रालयाची संसदेत माहिती

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने संरक्षित केलेल्या 50 स्मारकांचा (Protected National Monuments) देशात थांगपत्ता लागत नाही. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने यासंदर्भात संसदेत दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, देशातील 3,693 केंद्रीय संरक्षित स्मारकांपैकी 50 स्मारकांचा थांगपत्ता लागत नाही. ही एक गंभीर चिंतेची बाब असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

संसदेत सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की 3,693 पैकी 50 संरक्षित राष्ट्रीय स्मारकांचा (Protected National Monument) थांगपत्ता लागत नाही. सांस्कृतिक मंत्रालयाने परिवहन, पर्यटन आणि संस्कृतीबाबत संसदीय स्थायी समितीला 8 डिसेंबर रोजी अहवाल सादर केला.

यामध्ये म्हटले आहे की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या संरक्षणाखाली महत्त्वाची अनेक राष्ट्रीय स्मारकांचा वेगाने वाढणारे शहरीकरण, जलाशय आणि धरणांमुळे थांगपत्ता लागत नाही. ही एक गंभीर चिंतेची बाब आहे.

अहवालानुसार, समितीने 18 मे 2022 रोजी सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे महासंचालक व्ही विद्यावती आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले होते. थांगपत्ता नसलेल्या स्मारकांपैकी 11 उत्तर प्रदेशातील आहेत. तर प्रत्येकी दोन दिल्ली आणि हरियाणातील आहेत. या यादीत आसाम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील स्मारकांचाही समावेश आहे.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) नुसार, वेगाने वाढणाऱ्या शहरीकरणामुळे यापैकी 14 स्मारके बेपत्ता झाली आहेत. तर जलाशय किंवा धरणांमुळे 12 स्मारके बुडालेली आहेत. तर उर्वरित 24 स्मारकांची दुर्गम ठिकाण आणि घनदाट जंगलामुळे शोधण्यात अडचणी येत असल्याने थांगपत्ता लागत नाही.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, यापैकी अनेक स्मारके शिलालेखांशी संबंधित आहेत, ज्यांचे अचूक स्थान माहित नाही. 1930, 40 आणि 50 च्या दशकात आणि स्वातंत्र्यानंतरच्या दशकांमध्ये मोठ्या संख्येने केंद्रीय संरक्षित स्मारके ओळखली गेली. त्यानंतर त्यांचे जतन करण्याऐवजी नवीन स्मारके शोधण्यावर भर देण्यात आला. तसेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकारचे प्राधान्य आरोग्य आणि विकास याकडे होते. त्यामुळे स्मारकांकडे दुर्लक्ष करण्यात आले. आजही अनेक छोटी-मोठी वास्तू देखभालीअभावी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button