हिजबुल कमांडरच्या घरावर चालला बुलडोझर; दहशतवाद्याने सरकारी जमिनीवरच बांधला होता बंगला | पुढारी

हिजबुल कमांडरच्या घरावर चालला बुलडोझर; दहशतवाद्याने सरकारी जमिनीवरच बांधला होता बंगला

अनंतनाग : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर आमीर खान याच्या बंगल्यावर प्रशासनाने बुलडोझर फिरविला. आमीर याने सरकारी जमिनीवरच हे आलीशान घर बांधले होते.

प्रशासनाकडून आमीरच्या घराची एक भिंत पाडली जात असतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. आमीर हा ९० च्या दशकात पाकिस्तानात पळून गेला होता. पाकिस्तानातूनच तो भारतात विशेषत: : जम्मू आणि काश्मिरात दहशतवादी कारवायांची सूत्रे हलवत आलेला आहे.

अनेक दहशतवाद्यांनी सरकारी जमिनीवर कब्जा जमविलेला आहे. प्रशासन त्याविरोधात सातत्याने कारवाई करत आहे. पुलवामातील राजपोरा भागातील हजान बाला येथील दहशतवादी आशिक अहमद नेंगरू ऊर्फ अमजद भाई याचे घरही नुकतेच जमीनदोस्त करण्यात आले होते. अमजद हा जम्मू-काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचा सदस्य आहे. त्यानेही सरकारी जमिनीवर घर बनविले होते.

अमित शहा यांचे झिरो टॉलरन्स! 

अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत बैठक घेतली होती. यादरम्यान त्यांनी दहशतवादाबद्दल झिरो टॉलरन्स (शून्य दयामाया ) धोरण अवलंबिण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.

वर्षभरात १८६ दहशतवाद्यांचा खात्मा; १५९ जण जिवंत पकडले 

सरत्या वर्षात जम्मू-काश्मीरमध्ये एकूण १८६ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. १५९ दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी ही माहिती दिली. मृत दहशतवाद्यांमध्ये ५६ पाकिस्तानचे होते. लष्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-मोहम्मद या दशहतवादी संघटनांतून ते सक्रिय होते. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यां ५५७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा : 

Back to top button