E-KYC : आधार द्वारे ई-केवायसी व्यवहारात २२ टक्क्यांची वाढ : केंद्र सरकार | पुढारी

E-KYC : आधार द्वारे ई-केवायसी व्यवहारात २२ टक्क्यांची वाढ : केंद्र सरकार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  देशात ‘आधार’चा वापर सातत्याने वाढत असून नोव्हेंबर महिन्यात २८.७५ कोटी ई-केवायसी (E-KYC) व्यवहार ‘आधार’च्या सहाय्याने झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. त्याआधी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या व्यवहारांच्या तुलनेत ही वाढ २२% आहे.
नोव्हेंबर २०२२ च्या अखेरीस, ई-केवायसी (E-KYC) व्यवहारांची एकूण संख्या १३५०.२४ कोटी इतकी होती. बँका व बँकेतर आर्थिक सेवांमध्ये ‘आधार ई-केवायसी सेवे’मुळे पारदर्शकता आली असून ग्राहकांना येणाऱ्या अनुभवातही सुधारणा झाली आहे, यामुळे व्यवसाय करण्यात सुलभता निर्माण झाल्याचा दावा केंद्राने केला आहे. ‘आधार’धारकाने स्पष्ट मान्यता दिल्यानंतरच ई-केवायसी व्यवहार केला जातो. त्यात केवायसी संबंधित कागदोपत्री कामे आणि व्यक्तीच्या प्रत्यक्ष हजेरीची गरज संपुष्टात आली आहे.
नोव्हेंबरमध्ये १९५.३९ कोटी ‘आधार’ प्रमाणीकरणामार्फत व्यवहार झाले; हे ऑक्टोबरच्या तुलनेत ११ टक्क्यांहून जास्त आहेत. यातील बहुतांश मासिक व्यवहार बोटाच्या ठशाच्या आधारे केल्या जाणाऱ्या बायोमेट्रीक प्रमाणीकरण व त्यानंतर लोकसंख्याधारित विदा व ओटीपी अर्थात ‘वन टाईम पासवर्ड’च्या वापराद्वारे करण्यात आले.
ई-केवायसी (E-KYC) सेवेला सुरुवात झाल्यापासून ते नोव्हेंबर २०२२ अखेरपर्यंत एकूण ८६२१.१९ कोटी ‘आधार’ प्रमाणीकरणामार्फत व्यवहार झाले आहेत, असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
.हेही वाचा  

Back to top button