COVID-19 | चीनमधून भारतात परतलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, आरोग्य यंत्रणा सतर्क | पुढारी

COVID-19 | चीनमधून भारतात परतलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, आरोग्य यंत्रणा सतर्क

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनमधून सिंगापूरमार्गे आलेल्या सालेम कोइम्बतूर येथील एका व्यावसायिकाची कोरोना (COVID-19) चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. काल बुधवारी कनेक्टिंग फ्लाइटने कोइम्बतूरमध्ये आलेल्या ३७ वर्षीय व्यक्तीची विमानतळावर चाचणी पॉझिटिव्ह आली, अशी माहिती कोइम्बतूर आरोग्य प्रशासनाने दिली आहे. हा व्यक्ती सालेमजवळील इलाम्पिल्लई येथील कापड व्यावसायिक आहे.

कोईम्बतूर विमानतळाचे संचालक एस. सेंथिल वलवान यांनी गुरुवारी याबाबत पुष्टी केली. २७ डिसेंबर रोजी कनेक्टिंग फ्लाइटद्वारे चीनमधून परतलेल्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि राज्य आरोग्य यंत्रणा त्याच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून आहेत. अद्याप त्याला कोणतेही लक्षणे दिसून आलेली नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.

कोरोना चाचणीसाठी मंगळवारी त्याचे नमुने घेण्यात आले. त्याचा अहवाल बुधवारी आला आणि तो राज्य प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. कोईम्बतूर जिल्हा आरोग्य सेवा उपसंचालक पी. अरुणा यांनी सांगितले की, कोईम्बतूरहून कारने आपल्या गावी गेलेल्या त्या व्यक्तीला सध्या तेथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. सदर व्यक्ती पेशाने व्यावसायिक असून तो मूळचा इलाम्पिल्लई येथील गावचा रहिवासी आहे. तो गेल्या १३ वर्षांपासून चीनमध्ये व्यवसाय करत आहे. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे तो भारतात परतला आहे.

चीनमध्ये कोरोनाने (COVID-19) हाहाकार उडाला आहे. येथील मृतांचा आकडा वेगाने वाढत आहे. चीनमधील अनेक शहरांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी एक आठवड्याचे वेटिंग सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी कोरोनाबाबत खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

 हे ही वाचा :

Back to top button