

पुढारी ऑनलाईन : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे कडवे विरोधक अशी ओळख असलेले पावेल अॅन्टॉव (६५) यांचा ओडिशातील एका हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. पावेल यांचा मित्र व्लादिमिर बिडेनोव यांचाही याच हॉटेलमध्ये दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला होता. भारतातील एका हॉटेलमध्ये दोन रशियन नागरिकांचा दोन दिवसांत मृत्यू झाल्याने जगभरात या प्रकरणाची चर्चा होत आहे. (Vladimir Putin Critic Dies)
पावेल त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ओडिशातील रायागाडा परिसरात आले होते. रायागाडा येथील एका हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. त्यांचासोबत व्लादिमिर बिडेनोव्ह होते.
बिडेनोव्ह यांचा दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर पावेल यांचा मृतदेह मंगळवारी मिळून आला. पोलिसांनी परिस्थितीजन्य पुराव्यावरून दोन्ही मृत्यू संशयास्पद नसल्याचे म्हटले आहे. रायगाडा येथील पोलिस निरीक्षक रश्मी प्रधान म्हणाल्या, "पावेल टेरेसवरून पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात असू शकेल किंवा त्यांनी आत्महत्या केलेली असू शकते."
पावेल, बिडेनोव्ह यांच्यासमवेत अन्य दोघे रशियन नागरिक ओडिशात आले होते. पोलिसांनी या दोघांना चौकशीसाठी भारतात थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पावेल रशियातील मोठे उद्योजक होते. मटणाचे सॉसेज बनवण्याचा त्यांचा उद्योग आहे. व्लादिमिर स्टँडर्ड असे त्यांच्या कंपनीचे नाव आहे. पावेल हे फक्त उद्योजकच नव्हते तर तेथील विधानसभेवर ते उपसदस्य म्हणूनही काम करत होते. रशियातील व्लादिमिर प्रातांतील सरकारच्या शेती, निसर्ग व्यवस्थापन समितीचे ते प्रमुख होते. त्यांच्या संपत्तीची दखल रशियातील फोर्बर्स मासिकाच्या रशियातील आवृत्तीनेही घेतली होती.
रशियाने युक्रेनविरोधात छेडलेल्या युद्धाला त्यांनी विरोध केला होता. रशियाने जून महिन्यात युक्रेनवर क्षेपणास्त्र डागले होते. याची तुलना त्यांनी दहशतवादाशी केली होती. यासंदर्भातील त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर मोठी टीका झाल्याने त्यांनी ही पोस्ट हटवली होती.
हेही वाचा