Nirmala Sitharaman | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एम्समध्ये दाखल | पुढारी

Nirmala Sitharaman | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एम्समध्ये दाखल

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) सोमवारी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (एम्स) दाखल झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ६३ वर्षीय सीतारामन एम्स रुग्णालयाच्या खासगी वॉर्डमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, त्या नियमित तपासणीसाठी एम्समध्ये दाखल झाल्या असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

सीतारामन १ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यासाठी त्यांनी २१-२८ नोव्हेंबर दरम्यान व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या बैठकीत २०२३-२४ च्या अर्थसंकल्पापूर्वी विविध मुद्यांवर सल्लामसलत केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा दिली जात आहे. एम्सचे डॉक्टर त्यांच्या प्रकृतीबाबत लवकरच एक निवेदन जारी करणार आहेत. (Nirmala Sitharaman)

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दृष्टीने सीतारामन यांनी राज्यांचे अर्थमंत्री तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या प्रमुखांकडून सल्ले मागविले होते. राज्यांचे अर्थमंत्री तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या प्रमुखांसोबतही त्यांनी एक बैठक घेतली होती. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास कमी कालावधी राहिलेला आहे. या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाकडून विविध क्षेत्रांकडून सल्ले मागण्यात आले होते. अर्थमंत्र्यांनी याआधी आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता आदी क्षेत्रांशी संबंधित मान्यवरांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती.

हे ही वाचा :

Back to top button