बालपणी झालेल्‍या लैंगिक छळाचे दीर्घकालीन परिणाम, आरोपी शिक्षकाची बडतर्फी कायम : दिल्ली उच्च न्यायालय | पुढारी

बालपणी झालेल्‍या लैंगिक छळाचे दीर्घकालीन परिणाम, आरोपी शिक्षकाची बडतर्फी कायम : दिल्ली उच्च न्यायालय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बालपणी झालेल्‍या लैंगिक छळाचा मुलांच्‍या मनावर दीर्घकालीन परिणाम होतो. या वयातील मुलांची मानसिकता विकासाच्‍या टप्‍प्‍यात असते. याचा विचार होण्‍याची गरज आहे, असे निरीक्षण नोंदवत विनयभंग प्रकरणातील शिक्षकाची याचिका दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाच्‍या दोन सदस्‍यीय खंडपीठाने फेटाळली. तसेच संबंधित शिक्षकाची बडतर्फीचा निर्णयही कायम ठेवला.

२००६ मध्‍ये दिल्‍लीतील एका खासगी शाळेतील नववीच्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ आणि विनयभंग केल्याचा आरोप शिक्षकावर होता. चौकशीत तो दोषी आढळला होता. संबंधित शिक्षकाला १३ डिसेंबर २०११ रोजी दिल्‍ली स्कूल ट्रिब्युनलने बडतर्फ केले होते. तसेच दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाच्‍या एक सदस्‍यीय खंडपीठानेही हा निर्णय कायम ठेवला होता. या आदेशाला त्‍याने दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयात आव्‍हान दिले होते. यावर न्‍यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमोनियम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी खंडपीठाने स्‍पष्‍ट केले की, “बालपणी झालेल्‍या लैंगिक छळाचा मुलांच्‍या मनावर दीर्घकालीन परिणाम होतो. या वयातील मुलांची मानसिकता विकासाच्‍या टप्‍प्‍यात असते. याचा विचार होण्‍याची गरज आहे”.

शालेय शिस्‍तपालन समितीचा संबंधित शिक्षकाबाबत घेतलेला बडतर्फीचा निर्णय अयोग्‍य आहे, हे सिद्ध करण्यासाठी अपीलकर्त्यांनी कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. त्‍यामुळे याप्रकरणी शिस्‍तपालन समितीबरोबरच एक सदस्‍यीय खंडपीठाने शिक्षकाच्‍या बडतर्फीचा निर्णय कायम ठेवण्‍यात येत असल्‍याचेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा : 

 

 

Back to top button