AIIMS Cyber Attack : दिल्ली पोलिसांनी पत्राद्वारे मागवली इंटरपोलकडून चिनी हॅकर्सची माहिती | पुढारी

AIIMS Cyber Attack : दिल्ली पोलिसांनी पत्राद्वारे मागवली इंटरपोलकडून चिनी हॅकर्सची माहिती

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: राजधानी दिल्लीतील एम्स रूग्णालयातील सर्व्हरवर झालेल्या सायबर हल्ल्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. दिल्ली पोलिसांनी इंटरपोलच्या माध्यमातून चीनकडून हॅकर्सची माहिती मागवली आहे. दिल्ली पोलिसांनी यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे दिल्ली पोलिसांकडून या मेलच्या आयपी ॲड्रेसची माहिती मागविण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या ‘आयएफएसओ’ने सीबीआयला पत्र लिहून इंटरपोलकडून चीन आणि हाँगकाँगमधील हेनानच्या ईमेल आयडीच्या आयपी पत्त्यांची माहिती मागवली आहे, ज्याचा सायबर हल्ल्यासाठी वापर करण्यात आला होता. सीबीआय ही नोडल एजन्सी असल्याने त्यांना पत्र लिहिले आहे.

‘एम्स’च्या सर्व्हरवर रॅन्समवेअर हल्ला झाल्याच्या घटनेनंतर रुग्णालयातील डिजिटल सेवा टप्प्याटप्प्याने सुरळीत होत आहे. आता येथील ओपीडीमध्ये रुग्णांना उपचारासाठी पुन्हा ऑनलाइन अपॉइंटमेंटची सुविधा सुरू करण्यात आली आहे. रुग्ण आता घरी बसून देखील अपॉइंटमेंट सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

२० दिवस ते दीड महिन्यापर्यंत अपॉइंटमेंट वेटिंग

२३ नोव्हेंबर रोजी ‘एम्स’च्या सर्व्हरवर रॅन्समवेअर हल्ला झाल्याच्या घटनेनंतर ऑनलाइन अपॉइंटमेंटची सुविधा बंद करण्यात आली होती. सुविधा सुरू झाल्यानंतर अनेक विभागांचे स्लॉट भरले आहेत. अपॉइंटमेंटसाठी २० दिवसांपासून ते दीड महिन्यांपर्यंत वेटिंग कालावधीचा सामना रूग्णांना करावा लागत असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा:

Back to top button