नोरा फतेहीने जॅकलिन फर्नांडिसवर दाखल केला मानहानीचा खटला; म्हणाली, ‘तिने माझे करिअर उद्ध्वस्त…’ | पुढारी

नोरा फतेहीने जॅकलिन फर्नांडिसवर दाखल केला मानहानीचा खटला; म्हणाली, 'तिने माझे करिअर उद्ध्वस्त...'

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाठग सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाला नवे वळण लागले आहे. या प्रकरणात आता बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस एकमेकांना भिडल्या आहेत. नोराने दिल्ली कोर्टात जॅकलिन फर्नांडिस आणि अनेक मीडिया कंपन्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माझे नाव जबरदस्तीने वापरून माझी प्रतिमा खराब केल्याचा आरोप नोरा फतेहीने केला आहे.

सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गेले काही महिने प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही चांगलीच चर्चेत आली आहे. सुकेश चंद्रशेखरच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात ती सहआरोपी असल्याचा आरोप तिच्यावर आहे. तिने केलेल्या याचिकेमध्ये बॉलिवूडची अभिनेत्री नोरा फतेही हिचेदेखील नाव आले होते. यावरून नोराची कसून चौकशीदेखील झाली होती. मात्र, यानंतर संतापलेल्या नोराने थेट जॅकलिनला फैलावर घेत तिच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे.

नोराने दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय की, ‘जॅकलिन फर्नांडिसने स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माझे करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तिने माझ्याबद्दल खोटे विधान केले जे अनावश्यक आणि चुकीचे होते.’ याचसोबत तिने १५ मीडिया हाऊसविरुद्ध बदनामीकारक टिप्पणी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सुमारे 200 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सुकेश चंद्रशेखरला ‘ईडी’ने अटक केली. त्याचे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्याशी त्याचे निकटचे संबंध असल्याचे ‘ईडी’ला आढळून आले होते. त्यानंतर या दोघींचीही चौकशी करण्यात आली होती.

Back to top button