रुपयाच्या अवमूल्यनावरून संसदेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी | पुढारी

रुपयाच्या अवमूल्यनावरून संसदेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : रुपयाच्या अवमूल्यनावरून सोमवारी संसदेत सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. काँग्रेस खासदाराने उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. भारतीय रुपया अन्य चलनाच्या तुलनेत मजबूत स्थितीत आहे, असे अर्थमंत्र्यांनी सभागृहाला सांगितले.

रुपयाला बरे करून घरी आणण्याची काही योजना आहे का ? खा. रेड्डी

केंद्राला केवळ सरकार वाचवण्याचीच चिंता आहे. रुपयाचे सतत अवमूल्यन होत आहे. मात्र त्याची काहीही चिंता नाही. काँग्रेस सरकारमध्ये जेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपया ६६ रुपयांवर होता, तेव्हा भाजपचे नेते म्हणायचे की, रुपया आयसीयूत गेला आहे. आयसीयूच्या पुढे दोन मार्ग असतात. एक मार्ग बरे होऊन घरी येण्याचा आणि दुसरा थेट शवागाराचा. आता रुपया तर थेट शवागारात गेला आहे. मला अर्थमंत्र्यांना विचारायचे आहे की, रुपयाला बरे करून घरी आणण्याची काही योजना आहे का ? असा सवाल खासदार रेवनाथ रेड्डींनी प्रश्नोत्तर काळात विचारला.

भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था पण, विरोधकांना याचा त्रास होतोय : सीतारामण

डॉलर तसेच रुपयामध्ये चढ-उतार होत असल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रभाव पडू नये, यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परकीय चलन साठाच्या वापर केला आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांपैकी सर्वात अधिक प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक भारतात झाली आहे. भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. संसदेतील काही लोक देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेवर जळत आहेत. भारत सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. परंतु, विरोधकांना यामुळे त्रास होतोय, असे सीतारामण म्हणाल्या.

काँग्रेसच्या कार्यकाळात केवळ रुपयाच नाही. तर संपूर्ण अर्थव्यवस्थाच ‘आयसीयू’त होती. कोरोना संकट, रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवरही भारताची अर्थव्यवस्था वाढत आहे. यामुळे संसदेत बसलेल्या काही लोकांचा जळफळात होतोय. देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेवर गर्व व्हायला हवा, त्याची थट्टा मस्करी करणे योग्य नाही, अशा शब्दांत सीतारामण यांनी रेड्डी यांना सुनावले.

हेही वाचा : 

Back to top button