‘मोदींची हत्या करायला तयार रहा’, वादग्रस्त विधान करणा-या काँग्रेस नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

‘मोदींची हत्या करायला तयार रहा’, वादग्रस्त विधान करणा-या काँग्रेस नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे माजी मंत्री राजा पटेरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे देशातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. संविधान वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदींना मारायला तयार व्हा, असे पटेरिया यांनी म्हटले असून त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पटेरिया यांच्या या विधानानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे.

राजकारणात बदला घेण्याची भावना

पन्ना येथील काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी मंत्री राजा पटेरिया म्हणाले की, देशाचे संविधान वाचवायचे असेल आणि आदिवासींचे रक्षण करायचे असेल तर मोदींना मारायला तयार व्हा. आपल्या देशाच्या राजकारणात आता सौहार्द आणि बंधुभावाचा संबंध राहिलेला नाही. आता राजकारणात बदला घेण्याची भावना उघडपणे दिसू लागली आहे. राजकीय भाषेची पातळी सातत्याने घसरत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

‘मोदी निवडणुका संपवून टाकतील. मोदी धर्म, भाषा आणि जातीच्या आधारावर विभाजन करतील. अल्पसंख्यांकांचे जीव धोक्यात आहे. संविधान वाचावायचे असेल तर मोदींची हत्या करायला तयार राहा. हत्या म्हणजे हरवण्याचे काम, असेही पटेरिया यांनी म्हटल्याचे व्हिडीओमधून समोर आले आहे.

काँग्रेसचे स्पष्टीकरण

राजा पटेरिया यांचे विधान नीट ऐका, त्यांना मारून नव्हे तर निवडणुकीच्या वेळी त्यांचा पराभव करून संविधान वाचवण्याविषयी बोलत होते. भाजपचे अनेक नेते, माध्यमे खोटी माहिती पसरवत आहेत, असे मध्य प्रदेश काँग्रेस सेवादलाने म्हटले आहे. यासोबत त्यांनी एक व्हिडीओसुद्धा ट्विट केला आहे.

माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला – राजा पटेरिया

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पटेरिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर काँग्रेस नेत्याचे स्पष्टकरीण पुढे आले आहे. ‘माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय. मी मोदींचा पराभव करण्याबाबत बोलत होतो,’ असे पटेरिया यांनी म्हटले आहे.

Back to top button