Homai Vyarawalla : भारताच्या पहिल्या महिला फोटोजर्नलिस्ट 'होमाई व्यारावाला' उर्फ 'डालडा १३'...

पुढारी ऑनलाईन डेस्क : …असं म्हणतात एक फोटो हजारो शब्दांची जागा घेत असतो. एक फोटो अनेकांची गोष्ट सांगत असतो एवढी ताकद एका फोटोत असते. आजच्या घडीला फोटो काढणं खूप सोपं झालं आहे. कारण तुमच्या हातात मोबाईल आले, कमी किमतीचे कॅमेरे आले. शिवाय फोटो एक स्त्री काढते यातही आजकाल काही आश्चर्यकारक उरलेले नाही. पण ८०-९० वर्षापूर्वी सर्वसामान्यांसाठी फोटो म्हणजे एक आश्चर्यच असायचं. त्या काळात फोटोग्राफीच्या क्षेत्रात ‘होमाई व्यारावाला’ यांनी पाऊल टाकलं आणि भारताला मिळाली पहिली महिला फोटोजर्नलिस्ट. आज ‘होमी व्यारावाला’ (Homai Vyarawalla) यांचा जन्मदिवस. जाणून घेऊया त्यांचा जीवनप्रवास…
‘होमाई व्यारावाला’ भारताच्या पहिल्या महिला फोटोजर्नलिस्ट. गुजरातमधील नवसारी येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात १३ डिसेंबर १९१३ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हे अभिनय क्षेत्रात होते. घरात खेळीमेळीचं वातावरण होतं. त्या लहान असताना त्यांचे कुंटुंब मुंबईत उच्चशिक्षणासाठी आले आणि तिथेच स्थायिक झाले. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांची मानेक शॉ व्यारावाला यांच्याशी भेट झाली. तिथे त्यांच्या फोटोग्राफीची ओळख झाली. त्यांना मानेक शॉ व्यारावाला यांच्याकडून फोटोग्राफीबद्दल खूप काही शिकता आले. त्यानंतर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट अभ्यासक्रमा दरम्यान फोटोग्राफीतील तंत्र आणि बारकावे त्यांनी आत्मसात केले. होमाई या त्यांच्या वर्गातली मॅट्रिक पास झालेल्या एकट्याच मुली होत्या.
अनोख्या क्षेत्रात १९३८ मध्ये प्रवेश
होमाई व्यारावाला यांनी फोटोग्राफीसारख्या अनोख्या क्षेत्रात १९३८ मध्ये प्रवेश केला. ज्या काळात कॅमेरा म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी आश्चर्य होतं त्या काळात त्यांनी या क्षेत्रात पाऊलं टाकलं. भारताला पहिल्या महिला फोटोजर्नालिस्ट मिळाल्या. आपल्या फोटोग्राफीच्या माध्यमातून त्यांनी भारतासारख्या विकसनशील देशातील सामाजिक आणि राजकीय घटनांवर भाष्य केलं. त्यांनी भारतातील स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातील अनेक ऐतिहासिक क्षणांच्या त्या साक्षीदार होत्या.
Homai Vyarawalla : अनेक ऐतिहासिक क्षण कैद
कॅमेराचा एक क्लिक खूप काही व्यक्त होत असतो. पण तो क्लिक कसा आहे. त्याचा अँगल कसा आहे. हे खूप महत्वाचं असतं. होमाई व्यारावाला यांनी आपल्या कॅमेरातून हजारो फोटो कैद केले होते. १५ ऑगस्ट १९४७ मध्ये लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकवला तो अविस्मरणीय क्षण, लॉर्ड माउंटबॅटन भारतातून गेले तो क्षण, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, लालबहाद्दूर शास्त्री यांचे बरेच फोटो त्यांनी काढले होते.
Homai Vyarawalla : प्रत्येक फोटोसाठी मिळत असे एक रुपया
होमाई यांची पहिली असायमेंट ही त्यांच्या कॉलेजमधील होती. अमरनाथ मंदिरात पिकनिक पार्टीत सर जे.जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या महिला क्लबचे स्वतंत्रपणे फोटो काढले. त्यांचे पहिल्यांदा फोटो बॉम्बे क्रॉनीकल मध्ये प्रकाशित होत होते. त्यांना त्यावेळी प्रत्येक फोटोसाठी एक रुपया मिळतं असे. लग्नानंतर त्या आपल्या पतीसह दिल्ली येथे स्थायिक झाल्या. तिथे त्यांनी ब्रिटिश माहिती सेवा कर्मचारी म्हणून अनेक छायाचित्र काढली. दुसऱ्या महायुद्धानंतर त्या इलेस्ट्रेटिड विकली ऑफ इंडिया मॅगझिनमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि हे काम १९७० पर्यंत सुरु होते. यामध्ये त्यांची कृष्ण-धवल फोटो छापली जायची. त्यांच्या काही फोटोस्टोरीही टाईम, लाईफ, द ब्लॅक स्टार यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय प्रकाशनात प्रसिद्ध झाल्या होत्या.

Homai Vyarawalla : ‘डालडा १३’ हे टोपन नाव कसे पडले?
होमाई या आपल्या आजुबाजूला असलेल्या अनेक गोष्टींचा वापर फोटोसाठी अत्यंत खुबीने करायच्या. त्यामध्ये दिवसातील विविध छटा, सायंकाळ अशा बऱ्याच बाबींचा उल्लेख करता येईल. त्यांच्या फोटोतून त्या फोटोची मार्मिकता, खोली पटकन समजून यायची. त्यांचे काही फोटो ‘डालडा १३’ या उपनावाने प्रकाशित झाले होते. त्यापाठीमागे एक रंजक गोष्ट आहे. त्यांचा जन्म हा १९१३ साली झाला होता. वयाच्या १३ वर्षी त्या आपल्या भावी पतीला म्हणजे मानेक शॉ व्यारावाला यांना भेटल्या होत्या. त्यांच्या पहिल्या कारची नंबर प्लेट ही DLD १३ अशी होती. जी त्यांनी नोव्हेंबर १९५५ या वर्षी घेतली होती. याच डीएलडी ( DLD १३) वरुन होमाई यांचं टोपन नाव ‘डालडा १३’ असं पडलं आणि हे नाव रुढ झालं.

नेहरुंचे अनेक क्षण कैद
होमाई व्यारावाला यांनी आपल्या कारकिर्दीत स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरु यांचे बरेच क्षण आपल्या कॅमेरामध्ये कैद केले होते.
हा फोटो आहे दिल्लीच्या पालम विमानतळावरील. जेव्हा जवाहरलाल नेहरुंची बहीण विजयालक्ष्मी पंडित यांचा मास्कोच्या राजदूत पदाचा कार्यकाळ समाप्त झाला तेव्हा त्या दोघांची पालम विमानतळावर भेट झाली तो क्षण.
होमाई यांनी आपल्या नजरेतून काढलेले काही फोटो

राणी एलिझाबेथ II एका फॅशन शो दरम्यानचा हा क्षण. 1961 मध्ये हा शो दिल्लीतील सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीजमध्ये आयोजित केला होता.
26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला. यादिवशी दिल्लीत पहिल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड झाली. त्यावेळचा ऐतिहासिक क्षण
लॉर्ड माउंटबॅटन यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून शपथ घेतली. त्या दरम्यान राष्ट्रपती भवन ते संसद अशी बग्गीतून औपचारिक यात्रा काढण्यात आली होती. विजय चौकात आल्यावर हा क्षण त्यांनी कॅमेरात कैद केला.
पतीच्या निधानानंतर फोटोग्राफी सोडण्याचा निर्णय
१९७० मध्ये होमी यांच्या पतीचं निधन झालं. निधनानंतर त्यांनी फोटोग्राफी सोडण्याचा निर्णय घेतला. नंतर पुढील ४० वर्षात त्यांनी एकही फोटो काढला नाही. तरी ‘त्या’ फोटोग्राफीच्या क्षेत्रात नेहमीच एक खास व्यक्तिमत्व राहिल्या. त्यांचं या क्षेत्रातील कर्तृत्व पाहता त्यांना भारत सरकारने २०१० साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरविले.

फोटोग्राफीचं क्षेत्र सोडल्यानंतर होमी राजस्थानमध्ये पिलानी येथे वास्तव्याला गेल्या. तिथे मुलगा फारुखसह राहू लागल्या. १९८९ मध्ये मुलाचं कॅन्सरने निधन झालं. त्यानंतर त्यांनी एकाकी आयुष्य घालवलं. १५ जानेवारी २०१२ रोजी त्यांचं निधन झालं.

हेही वाचा