

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) मंगळवारी वाहनांच्या त्रुटीबाबत मोठा निर्णय जाहीर केला. २ ते २८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान उत्पादित एकूण ९,१२५ वाहने परत मागवली जाणार आहेत. यात सियाझ (Ciaz), ब्रेझा (Brezza), एर्टिगा, XL6 आणि ग्रँड विटारा या मॉडेलचा समावेश असल्याचे मारुती सुझुकीने म्हटले आहे.
"या वाहनांच्या पुढील सीट बेल्ट जवळ एका लहान भागांमध्ये संभाव्य दोष आहे, ज्यामुळे क्वचित प्रसंगी सीट बेल्ट निघू शकतात," असे कंपनीने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. संबंधित वाहनांची मोफत तपासणी आणि सदोष भाग बदलून देण्यासाठी ती परत मागवण्याचा निर्णय घेतला असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. "ज्यांच्याकडे अशी वाहने आहेत त्या संबंधित वाहन मालकांशी कंपनीच्या अधिकृत वर्कशॉप्समधून त्वरित संपर्क साधला जाईल." असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मारुती सुझुकी इंडियाने ४ डिसेंबर रोजी म्हटले होते की चालू आर्थिक वर्षात २० लाख युनिट्सच्या उत्पादनाच्या उद्दिष्टापेक्षा कमी उत्पादन होऊ शकते. दरम्यान, नवीन लाँच झालेल्या SUV Grand Vitara चे सप्टेंबरपासून एकूण ८७,९५३ बुकिंग झाले आहे आणि सध्या ५५,५०५ युनिट्सची ऑर्डर देणे बाकी आहे.
या आर्थिक वर्षातील एप्रिल-नोव्हेंबर दरम्यानच्या कालावधीतील कंपनीची एकूण घाऊक विक्री १३,११,८९० युनिट्स होती. मागील वर्षी याच कालावधीत १०,१०,६७४ युनिट्स विक्री झाली होती. या कालावधीत देशांतर्गत घाऊक विक्री ११,३९,०७२ युनिट्स झाली होती. जी एका वर्षापूर्वी ८,६३,०३२ युनिट्स झाली होती. (Maruti Suzuki)
हे ही वाचा :