नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : एअर इंडियाच्या (Air India) बिझनेस क्लासमधील एक धक्कादायक आणि लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये एका मद्यधुंद अवस्थेतील एका पुरुष प्रवाशाने महिला सहप्रवाशावर लघुशंका केली. याप्रकरणी ७० वर्षीय महिला प्रवाशाने तक्रार केल्यानंतर केबिन क्रू मेंबर्सनी त्याची दखल घेतली नाही. त्यानंतर सदर महिलेने थेट टाटा समूहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांना पत्र लिहिल्यानंतर या प्रकाराची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
२६ नोव्हेंबर २०२२ रोजी एअर इंडियाचे विमान जेएफके (अमेरिका) वरून दिल्लीला जात असताना हा प्रकार घडला आहे. या घटनेबाबत एअर इंडियाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पुरुष प्रवाशाच्या कृत्यानंतर महिलेने केबिन क्रू मेंबर्सकडे तक्रार केली. पण त्यांनी त्या प्रवाशावर कसलीही कारवाई केली नाही. यामुळे विमान दिल्लीत उतरल्यानंतर तो पुरुष प्रवाशी बिनधास्तपणे निघून गेला. त्यानंतर महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना पत्र पाठवल्यानंतरच एअर इंडियाने या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे, असे सूत्राकडून सांगण्यात आले आहे.
२६ नोव्हेंबर रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी १ च्या सुमारास न्यूयॉर्क-जेएफके विमानतळावरून निघालेल्या एअर इंडिया (Air India ) फ्लाइट AI-102 मध्ये ही घटना घडली. "दुपारचे जेवण झाल्यावर आणि लाइट बंद झाल्यानंतर दुसरा एक प्रवासी मद्यधुंद अवस्थेत माझ्या सीटकडे आला. त्याने त्याच्या पँटची चेन काढली आणि माझ्यासमोरच लघुशंका केली. हा प्रकार किळसवाणा आणि लज्जा उत्पन्न होईल असा होता", असे महिलेने पत्रात म्हटले आहे. त्याने लघुशंका केल्याने कपडे, बॅग आणि शूज भिजल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
लघुशंका केल्यानंतर तो माणूस तिथेच उभा राहिला. हा खूप लज्जास्पद प्रकार होता. त्यानंतर एका सहप्रवाशाने त्याला निघून जाण्यास सांगितले आणि त्यानंतरच तो तेथून निघून गेला. तो निघून गेल्यावर ताबडतोब केबिन क्रू मेंबर्सला घडलेला प्रकार निर्दशनास आणून दिला. "कपडे, शूज आणि पिशवी लघवीने पूर्णपणे भिजली होती. लघवीचा वास येत होता. त्यानंतर पिशवी आणि शूजवर जंतुनाशक फवारले …," असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
त्यानंतर त्या एअरलाइनच्या स्वच्छतागृहात निघून गेल्या. विमानातील कर्मचाऱ्याने त्यांना पायजामा आणि चप्पल बदलण्यासाठी दिले. त्या सुमारे २० मिनिटे स्वच्छतागृहाजवळ उभ्या राहिल्या. कारण त्यांना त्यांच्या भिजलेल्या सीटवर परत जायचे नव्हते. त्यानंतर त्यांना एक अरुंद क्रू सीट देण्यात आली, जिथे त्या एक तास बसल्या आणि नंतर त्यांना त्यांच्या सीटवर परत येण्यास सांगण्यात आले. "विमानातील कर्मचाऱ्यांनी भिजलेल्या सीटवर कागद टाकले. तरीही सीटवर लघवीचा वास येत होता आणि ती ओलसर होती," अशा शब्दांत त्यांनी घडलेला प्रकार पत्रातून सांगितला आहे.
हे ही वाचा :