Sunanda Pushkar death case | सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी शशी थरूर यांना दिल्ली हायकोर्टाची नोटीस | पुढारी

Sunanda Pushkar death case | सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी शशी थरूर यांना दिल्ली हायकोर्टाची नोटीस

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी (Sunanda Pushkar death case) काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिल्लीतील एका कनिष्ठ न्यायालयाने १८ ऑगस्ट २०२१ रोजी शशी थरूर यांना सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी दोषमुक्त केले होते. या निकालाविरोधात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या अपीलवर दिल्ली उच्च न्यायालयाने शशी थरूर यांना नोटीस बजावली आहे.

शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा दिल्लीतील एका हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. सुनंदा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप थरुर यांच्यावर होता. याआधी सुनंदा आत्महत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शशी थरुर यांची चौकशी केली होती. सुनंदा यांनी मृत्यूआधी थरुर यांचे पाकिस्तानी महिला पत्रकाराशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यू प्रकरणी दिल्ली पोलिसांनी थरुर यांना आरोपी बनविले होते. त्यांच्या विरोधात आयपीसी कलम ३०७, ४८९ ए अन्वये गुन्हा नोंद केला होता. पण दिल्लीतील राउज एवेन्य कोर्टाने थरुर यांना आरोपमुक्त केले होते.

सुरुवातीच्या चौकशीत सुनंदा यांचा मृत्यू औषधांच्या ओव्हरडोसमुळे झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या हायप्रोफाईल प्रकरणात १९ जानेवारी २०१४ रोजी सुनंदा यांच्यावर एम्समध्ये पोस्टमार्टम झाले. तेथील डॉक्टरांनी सुनंदा यांच्या शरीरावर १२ हून अधिक खुणा आढळून आल्याचे म्हटले होते. फॉरेन्सिक सायन्स ऑटोप्सी एनालिसिस रिपोर्टमध्ये सुनंदा पुष्कर मानसिक तणावाखाली होत्या आणि त्यांनी काही दिवस अन्नपाणी सोडून दिल्याचा खुलासा करण्यात आला होता. या रिपोर्टमध्ये त्यांचा मृत्यू नैसरिकरित्या झाला नसल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती.

शशी थरुर आणि सुनंदा पुष्कर यांचे २०१० मध्ये लग्न झाले होते. दोघांची भेट २००७ मध्ये एका कार्यक्रमादरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांनी सुनंदा यांच्याशी लग्न केले. थरुर यांचे सुनंदा यांच्याशी झालेले हे तिसरे लग्न होते. लग्नानंतर चार वर्षांनतर दोघांच्या वाद असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर २०१४ मध्ये त्या दिल्लीतील हॉटेलात मृतावस्थेत सापडल्या होत्या. सुनंदा यांच्या भावाने म्हटले होते की ती वैवाहिक जीवनात खुश होती. मात्र, मृत्यूच्या आधी काही दिवस तणावात होती. (Sunanda Pushkar death case)

हे ही वाचा :

Back to top button