Delhi Mumbai Expressway : मुंबई-दिल्‍ली एक्स्प्रेस वेचा प्रवास 12 तासांत, महामार्गाची वैशिष्ट्ये पाहून म्हणाल जबरदस्त... | पुढारी

Delhi Mumbai Expressway : मुंबई-दिल्‍ली एक्स्प्रेस वेचा प्रवास 12 तासांत, महामार्गाची वैशिष्ट्ये पाहून म्हणाल जबरदस्त...

नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा : दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेमुळे दोन्ही ठिकाणांतील प्रवासाचे 24 तासांचे अंतर निम्म्याने कमी होऊन 12 तासांवर येईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. मार्च 2023 पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. सोमवारी हरियाणातील सोहना येथे त्यांनी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेची पाहणी केली. (Delhi Mumbai Expressway to reduce travel time to 12 hours Key details you need to know)

यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि राज्यमंत्री राव इंद्रजित सिंह उपस्थित होते. रस्ते प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गडकरींनी सांगितले की, या प्रकल्पात उच्च गुणवत्तेची काळजी घेतली जात आहे. वेळेची मर्यादा, तसेच गुणवत्तेची काळजी न करणार्‍यांचा बँड वाजवू. त्यांना असेच सोडणार नाही.

या मार्गामुळे मुंबई-दिल्लीतील (Delhi Mumbai Expressway) अंतर 130 किलोमीटरने कमी होईल. पुढे गरज भासली, तर हा मार्ग 12 पदरी करू. या एक्स्प्रेस वेवर गाड्या 120 किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकतील. 95 हजार

कोटी रुपये खर्चून बांधला जात असलेला हा देशातला सर्वात लांब महामार्ग असेल. या रस्ते बांधकामामुळे दिवसाला हजारोंना रोजगार मिळाला आहे.

सासर्‍याचेही बांधकाम पाडले…

गडकरी म्हणाले, मी रस्ता बनविण्यासाठी एकदा माझ्या सासर्‍याच्या बांधकामावरही बुलडोझर चालवला आहे. या एक्स्प्रेस-वेमध्ये कुठलीही अडचण येऊ देणार नाही. खराब काम करणार्‍याला दुसर्‍या दिवशी हाकलून देईन. जगात सर्वाधिक वैशिट्यपूर्ण ठरणारा हा मार्ग देशासाठी अभिमानाचा विषय असेल, हा माझा शब्द आहे.

375 किलोमीटरचा मार्ग पूर्ण

9 मार्च 2019 रोजी या एक्स्प्रेस वेच्या बांधकामास परिवहनमंत्री नितीन गडकरी, अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला होता. 8 पदरी असलेल्या या मार्गाचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. 1380 पैकी 1200 किलोमीटर मार्गाचे काम सुरू आहे. 375 किलोमीटरचा रस्ता पूर्ण झाला आहे.

एक्स्प्रेसवेची वैशिष्ट्ये

या महामार्गामुळे जयपूर, किशनगड, अजमेर, कोटा, चित्तौडगड, उदयपूर, भोपाळ, उज्जैन, इंदूर, अहमदाबाद, सूरत या शहरांत जाणे-येणे सोपे होईल.

ठिकठिकाणी हेलिपॅडची सुविधा असेल. ज्याद्वारे आणीबाणीच्या स्थितीत रुग्णांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयात पोहोचवता येईल.

या एक्स्प्रेस वेवरील टोल रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्राद्वारे संकलित केला जाईल.

पुढील वर्षी मार्चपर्यंत दिल्ली ते दौसा हा मार्ग खुला करण्याचे नियोजन.

एक्स्प्रेस वेच्या कडेला 20 लाख झाडे लावणार

3 अ‍ॅनिमल पास आणि 5 ओव्हर पासचे काम सुरू

या एक्स्प्रेस वेमुळे 320 दशलक्ष लिटर इंधनाची बचत होणार, तसेच 850 दशलक्ष केजी कार्बन उत्सर्जन कमी होणार

वेळमर्यादा, गुणवत्ता  न पाळणार्‍यांना दंड करणार

1380 किलोमीटर लांबीचा, आठ पदरी मार्ग गरज भासल्यास महामार्ग 12 पदरी करणार, 120 कि.मी. प्रतितास वेगाने गाड्या धाऊ शकतील

प्रकल्पाचा खर्च 95 हजार कोटी रुपये

Back to top button