‘लग्नाचे वचन हे विवाहित महिलेवर बलात्काराच्या गुन्ह्याचे कारण नव्हे’ – केरळ न्यायालयाने आरोप केले रद्द | पुढारी

'लग्नाचे वचन हे विवाहित महिलेवर बलात्काराच्या गुन्ह्याचे कारण नव्हे' - केरळ न्यायालयाने आरोप केले रद्द

सहमतीने संबंध असल्याचा कोर्टाचा निर्वाळा

पुढारी ऑनलाईन – केरळ उच्च न्यायालयाने एका २५ वर्षांच्या युवकावरील बलात्काराचे आरोप रद्द केले आहेत. विवाहित महिलेशी विवाहाचे वचनाने ठेवलेले संबंधासाठी बलात्कारासाठीच्या कलम ३७६ मधील तरतुदी लागू होत नाहीत, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती कौसर इडाप्पागथ यांनी हा निकाल दिला आहे. या प्रकरणात २५ वर्षीय तरुण टिनो थंकाचनवर कलम ३७६, कलम ४९३ आणि कलम ४१७ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. थंकाचन याने लग्नाचे वचन देऊन या महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले, असे आरोपपत्रात म्हटले होते. ही महिला विवाहित असून पतीपासून दूर राहते.

यावर न्यायालयाने २२ नोव्हेंबरला निकाल दिला. “पीडित महिलेचे या युवकाशी सहमतीने संबंध होते. या तरुणाशी कायदेशीर लग्न होणार नाही, हे तिला माहिती होते. ज्या कारणांची अंमलबजावणी करता येत नाही, आणि जी वचनं बेकायदेशीर आहेत, त्यावर कलम ३७६नुसार गुन्हा नोंद होऊ शकत नाही,” असे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्तींनी म्हटले आहे की, “या प्रकरणात महिला विवाहित आहे आणि आरोपीशी कायदेशीर लग्न होऊ शकणार नाही, याची कल्पना होती, त्यामुळे कलम ३७६ लागू होऊ शकत नाही. तसेच फसवणुकीचा गुन्हा नोंद होईल, असे ही प्रकरणात काही नाही.”
या प्रकरणातील तरुणाने दोषारोपपत्र रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती.

हेही वाचा

Back to top button