बारामती : गतिमंद मुलीवर बलात्कार; आरोपीला सश्रम कारावास | पुढारी

बारामती : गतिमंद मुलीवर बलात्कार; आरोपीला सश्रम कारावास

बारामती; पुढारी वृत्तसेवा : शौचासाठी घराबाहेर गेलेल्या गतिमंद मुलीला मारहाण करीत तिच्यावर बलात्कार केल्याच्या खटल्यात येथील विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश ए. ए. शहापुरे यांनी कामाजी शिवाजी चोरमले (रा. दहिटणे, ता. दौंड) याला दोषी धरत सात वर्षांचा सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. 8 ऑगस्ट 2014 रोजी ही घटना घडली होती. पीडित 18 वर्षीय मुलगी शौचासाठी गावाबाहेर गेली असताना तिच्या गतिमंद असण्याचा फायदा घेत चोरमले याने तिला मारहाण करीत तिच्यावर बलात्कार केला होता.

ही बाब पीडितेने घरी सांगितल्यानंतर तिच्या आईने तिला यवत पोलिस ठाण्यात नेले. तेथे पीडितेने फिर्याद दाखल केली. त्यानुसार चोरमले याच्याविरोधात विनयभंग, मारहाण, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एस. पी. जाधव यांनी या घटनेचा तपास करीत आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. संदीप ओहोळ यांनी काम पाहिले. पीडित मुलीने न्यायालयात घडलेली घटना सविस्तर सांगितली. दोन वैद्यकीय अधिकार्‍यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. याशिवाय पीडितेच्या आईसह अन्य दोघांची साक्ष घेण्यात आली.

अ‍ॅड. ओहोळ यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत बलात्कारप्रकरणी सात वर्षे सश्रम कारावास व 2 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने कारावास, मारहाणप्रकरणी 1 वर्ष सश्रम कारावास व भादंवि कलम 506 अंतर्गत 2 वर्षे सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात जिल्हा न्यायालय पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, महिला सहायक पोलिस निरीक्षक तावरे यांनी काम पाहिले. यवतचे पोलिस निरीक्षक नारायण पवार, सहायक फौजदार एन. ए. नलावडे, वेनुनाद ढोपरे यांचे सरकार पक्षाला सहकार्य झाले.

Back to top button