महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबतचा दावा ताकदीने लढणार : पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबतचा दावा ताकदीने लढणार : पृथ्वीराज चव्हाण

कराड: पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ दिवस तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे ते निश्चितच महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करतील. याबाबत 2004 मध्ये महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात दाखल केलेला दावा प्रलंबित आहे. त्या दाव्यावर कर्नाटक सरकारने 2014 साली प्रति दावा दाखल केला आहे. तो दावा ताकदीने लढण्यासाठी न्यायालयात राज्य सरकारने वकिलांची फौज तयार केली आहे. त्यामुळे आज कर्नाटक सरकार किंवा तेथील मुख्यमंत्री काय म्हणतात. याला अर्थ नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. कराड येथे निवासस्थानी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच चार्ज झाले आहेत. यात्रेदरम्यान अनेक उत्साहवर्धक कार्यक्रम पार पडले. यामध्ये समविचारी पक्षाचे नेते सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. आत्तापर्यंत सर्वात उस्फूर्तपणे भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात झाल्याचे राहुल गांधी यांनी स्वतः सांगितले आहे.

गुजरातच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसपेक्षा भाजपमध्ये जास्त बंडखोरी झाली आहे. तेथे आप ही मोठ्या प्रमाणात उतरली आहे. मात्र तेथे खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्येच होईल, असे मला वाटते. आप ही भाजपची बी टीम असल्याचा पुनरुचार करून चव्हाण यांनी मत विभागणीचा फायदा आजपर्यंत भाजप घेत असल्याचे सांगितले.

तोपर्यंत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही

सीमाप्रश्नाबाबत न्यायालयात दाखल असलेल्या दाव्याचा निकाल लागत नाही. तोपर्यंत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही. हा दावा ताकदीने लढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वकिलांची फौज उभी केली आहे. महाराष्ट्रातील दोन मंत्री जाऊन त्या वकिलांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. तसेच महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समितीचे पुनर्गठन केले असून त्याबाबत बैठक नुकतीच मुंबई येथे सकारात्मक वातावरणात पार पडली.

राज्यपालांना कोपरापासून नमस्कार….

राज्यपालांना कोपरापासून नमस्कार, असे म्हणत त्यांना पुन्हा हिमाचल प्रदेशला जायचं आहे. मला राज्यपाल पदातून मुक्त करा, असे त्यांचे म्हणणे असावे. म्हणून ते वारंवार अशी वक्तव्य करत असावेत, असे सांगत त्याबाबत अधिक बोलण्याचे चव्हाण यांनी टाळले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशासकीय इमारत व विश्रामगृहाचे होणार उद्घाटन…

कराडमधील प्रशासकीय इमारत व विश्रामगृहाचे उद्घाटन व रेठरे बुद्रुक व पाचवड फाटा येथील नदीवरील पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते २५ नोव्हेंबररोजी दुपारी बारा वाजता होणार आहे. कराडमध्ये भविष्यात प्रशासकीय सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केले आहेत व करत आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button