Education : आता 4 वर्षात ‘पदवी’, 2023-24 शैक्षणिक वर्षापासून प्रवेश सुरू, युजीसीकडून अभ्यासक्रम तयार | पुढारी

Education : आता 4 वर्षात 'पदवी', 2023-24 शैक्षणिक वर्षापासून प्रवेश सुरू, युजीसीकडून अभ्यासक्रम तयार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Education : केंद्र सरकारने नवीन शिक्षण धोरण जाहीर केल्यानंतर आता देशभरात पदवी अभ्यासक्रम 4 वर्षांचा करण्यात येणार आहे. लवकरच यासंबंधीचे नियम सार्वजनिक केले जातील. देशातील सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमांसंबंधी नियम तयार केले जात आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) अभ्यासक्रमांसंबंधीची रूपरेषादेखील तयार करण्यात आली आहे.

Education : शैक्षणिक सत्र 2023-24 पासून सर्व विद्यापीठांमधील नवीन विद्यार्थी 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतील. यासंबंधीचे सर्व नियम तसेच दिशानिर्देश तयार करण्यात आले असून, पुढील आठवड्यात देशातील सर्व विद्यापीठांना यासंदर्भात माहिती दिली जाईल. देशातील सर्व 45 केंद्रीय विद्यापीठांमध्ये पुढील शैक्षणिक सत्रापासून हा अभ्यासक्रम लागू केला जाईल. सर्व केंद्रीय विद्यापीठांसह बहुतांश राज्यस्तरीय तसेच खासगी विद्यापीठेदेखील हा अभ्यासक्रम लागू करू शकतील. यासोबतच देशभरातील ‘डीम्ड’ (अभिमत) विद्यापीठांनादेखील हा अभ्यासक्रम लागू करता येईल.

Education : ‘यूजीसी’ने दिलेल्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा पर्याय उपलब्ध करवून दिला जाईल. परंतु, विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश बंधनकारक नसेल. तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रमही विद्यार्थी निवडू शकतात. यासोबतच विद्यापीठांना यासंदर्भात नियम बनवण्याची मुभा दिली जाईल. विद्यापीठांची अ‍ॅकेडेमिक परिषद तसेच एक्झिक्युटिव्ह कौन्सिल यासंबंधीचे नियम तयार करतील. पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकणार्‍या विद्यार्थ्यांनादेखील 4 वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाचा पर्याय विद्यापीठे उपलब्ध करवून देऊ शकतात.

हे ही वाचा :

Eyecare : ऐन लग्नाच्या सिझनमध्ये डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे व सुजलेल्या डोळ्यांपासून मुक्त होण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

राज्यात आता तिसरीपासून परीक्षा; पुढील वर्षापासून राबविणार शिक्षणाचा ‘केरळ पॅटर्न’

Back to top button