राज्यात आता तिसरीपासून परीक्षा; पुढील वर्षापासून राबविणार शिक्षणाचा ‘केरळ पॅटर्न’ | पुढारी

राज्यात आता तिसरीपासून परीक्षा; पुढील वर्षापासून राबविणार शिक्षणाचा ‘केरळ पॅटर्न’

मुंबई; चंदन शिरवाळे : राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकार राज्यात आता शिक्षणाचा ‘केरळ पॅटर्न’ राबविणार आहे. त्यानुसार पुढील वर्षापासून तिसरीच्या विद्यार्थांची वार्षिक सराव परीक्षा सुरू करणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील वर्गांच्या परीक्षा घेण्यात येतील.

राज्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात पाठविले जात आहे. काही खासगी शाळा वगळता सरकारी शाळांमध्ये परीक्षा घेतली जात नसल्यामुळे विद्यार्थांमध्ये अभ्यासाची गोडी राहिली नाही. नापास होणारच नाही; तर अभ्यास कशासाठी करायचा, अशी मानसिकता तयार झाल्यामुळे त्यांचे वाचनही कमी झाले आहे. भविष्यातील धोका लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत बदल करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण अधिकारी राजस्थान, गुजरात आणि केरळमधील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पद्धतीचा अभ्यास करत आहे.

राज्य शिक्षण संचालक कैलास पगारे म्हणाले, महाराष्ट्रात 8 वी पर्यंतच्या परीक्षा बंद करण्यात आल्या आहेत; पण शेजारच्या राजस्थानमध्ये 5 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डामार्फत परीक्षा घेतल्या जात आहेत. तर गेल्या वीस वर्षांपासून पंजाबमध्ये परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची बँक आहे. केरळमध्येही इंग्रजी शिक्षणासाठी खासगी शिक्षण संस्थांना पसंती दिली जाते. इंग्रजीसह स्थानिक भाषेमधून शिक्षण घेण्याचे प्रमाण अधिक आहे; पण तितकाच विश्वास सरकारी शिक्षणावरही आहे. त्यामुळे तेथील प्राथमिक विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत आघाडीवर आहेत.

Back to top button