Satyendar Jain jail massage controversy | तिहार जेलमध्ये मंत्री सत्येंद्र जैन यांना मसाज करणारा निघाला बलात्कार प्रकरणातील आरोपी | पुढारी

Satyendar Jain jail massage controversy | तिहार जेलमध्ये मंत्री सत्येंद्र जैन यांना मसाज करणारा निघाला बलात्कार प्रकरणातील आरोपी

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : मनी लाँड्रिंग प्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या (Satyendar Jain jail massage controversy) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तिहार तुरुंगातील एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. त्यात जैन त्यांच्या बॅरेकमध्ये मसाज करवून घेताना दिसले होते. या प्रकरणी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्येंद्र जैन यांना मसाज करणारा व्यक्ती हा फिजिओथेरपिस्ट नसून तो बलात्कार प्रकरणातील एक आरोपी आहे. त्याच्यावर POCSO च्या कलम ६ आणि IPC च्या कलम ३७६, ५०६ आणि ५०९ अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.

दिल्ली पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मसाज करणाऱ्या आरोपीचे नाव रिंकू आहे. त्याला २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. घरात कोणी नसताना जन्मदात्या बापानेच बलात्कार केला, असा त्याच्या अल्पवयीन मुलीचा आरोप आहे. द्वारका जिल्ह्यातील जाफरपूर काला पोलीस ठाण्यातील हे प्रकरण आहे. आरोपी रिंकू तुरुंगात आहे आणि त्याच्यावर आता खटला सुरू आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तिहारमधील सीसीटीव्ही फुटेजनंतर जैन यांना तुरुंगात व्हीआयपी सुविधा पुरवली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. व्हिडिओत जैन त्यांच्या बॅरेकमध्ये मसाज करवून घेताना दिसले होते. हे फुटेज व्हायरल झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हे फुटेज न्यायालयात सादर करत तक्रार केली आहे.

या प्रकरणानंतर भाजपने आम आदमी पक्षावर टीकास्त्र सोडले होते. आम आदमी पार्टी स्पा आणि मसाज पार्टी बनली आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केली होती. कारागृहात असतानादेखील जैन दिल्ली सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांना मंत्रीपदावरून का हटवण्यात आले नाही? असा सवाल उपस्थित करीत केजरीवाल यांनी यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी भाटिया यांनी केली होती.

आपनं भाजपला दिले प्रत्युत्तर

भाजप खालच्या स्तराचे राजकारण करीत आहे. जैन ६ महिन्यांपासून कारागृहात बंद आहेत. त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. डॉक्टरांनी त्यांना फिजिओथेरेपी करण्याचा सल्ला दिला आहे. कुठल्याही व्यक्तीला दुखापत झाली असेल, डॉक्टर उपचार करीत असतील, फिजियोथेरेपी करीत असतील तर त्याचे हसू उडवण्यात भाजपवाल्यांना लाज वाटत नाही, असे खडेबोल उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी भाजप नेत्यांना सुनावले होते. (Satyendar Jain jail massage controversy)

हे ही वाचा :

Back to top button