पुढारी ऑनलाईन डेस्क : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात अटक असलेले दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांचा मसाज करून घेत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी शनिवारी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सत्येंद्र जैन जेलमध्ये मसाज करून घेताना दिसत आहेत. दरम्यान, तुरुंगात मंत्र्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याप्रकरणी तिहार तुरुंग अधीक्षक अजित कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर काही दिवसानंतर हा व्हिडिओ समोर आला आहे. आता या व्हिडिओवरून भाजपने आपवर टीकेची झोड उठवली आहे.
कारागृहातील असलेले महाठग सुकेश चंद्रशेखर यांनी तुरुंगात असलेल्या सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप कारागृह क्रमांक 7 च्या अधीक्षकांवर केला होता. त्यानंतर दिल्लीच्या उपराज्यपालांनी स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या शिफारशीवरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
आम आदमी पार्टी (आप) नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी या व्हिडिओवरून टीका करणाऱ्या भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, जैन यांना पाठीच्या दुखापतीमुळे फिजिओथेरपीचा सल्ला देण्यात आला होता, परंतु भाजप त्यांच्या आजाराची खिल्ली उडवत आहे. भाजप बिनबुडाचे आणि निराधार आरोप करत आहे.
पत्रकार परिषदेत भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, आम आदमी पक्षात भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी आणि व्हीव्हीआयपी संस्कृती संपवण्यासाठी पक्ष स्थापन केला होता. पण येथे एका भ्रष्ट मंत्र्यांना सर्व सुविधा मिळत आहेत. यावर केजरीवाल गप्प का आहेत.
भाजप नेते शहजाद जयहिंद यांनी व्हिडिओ ट्विट करून लिहिले आहे की, तुरुंगात व्हीव्हीआयपी वागणूक, केजरीवाल अशा मंत्र्याचा बचाव करू शकतात का? यातून 'आप'चा खरा चेहरा दिसून येत आहे.
दरम्यान, ईडीने तिहार तुरुंगातील सत्येंद्र जैन यांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधेचे सीसीटीव्ही फुटेज कोर्टात सादर केले होते. तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांना हेड मसाज, पायाची मसाज आणि बॅक मसाज यांसारख्या सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत. मंत्र्याला तुरुंगात अडचण येऊ नये, यासाठी तुरुंग अधीक्षक सत्येंद्र जैन यांची रोज नियमाविरुद्ध भेट घेतात, असाही दावा ईडीने केला होता.
हेही वाचलंत का ?