

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर याच्यावर मंडोली कारागृहात झालेल्या हल्ल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कारागृह प्रशासनाला नोटीस बजावत एका आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्यासंदर्भात खुलासा करणारे पत्र लिहिल्याने कारागृहात त्रास दिला जात असल्याचा आरोप सुकेशने याचिकेतून केला आहे. कारागृहात धमक्या दिल्या जात असून असभ्य वर्तन केले जात असल्याचा दावा देखील सुकेशने केला आहे.
दिल्ली सरकारच्या अधिकार क्षेत्राबाहेर इतर कारागृहात स्थानांतरित करण्याची मागणी करीत सुकेशने नव्याने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आर्थिक गुन्हे शाखा तसेच सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिलेल्या माहितीच्या आधारे १०४ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने ते विरोधात गेले आहेत. दिल्ली सरकारमधील मोठ्या नेत्यांवर आरोप करण्यात आल्याने हल्ले, गैरवर्तन तसेच त्रासाचा सामना करावा लागत असल्याचे सुकेशने याचिकेतून नमूद केले आहे.
सुकेशच्या पत्रानंतर कारागृहातील १०५ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे, तर काहींना निलंबित करण्यात आले आहे. कारागृहातील आरोपी कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांपैकी ८२ विरोधात खटले सुरू झाले आहेत. दिल्ली सरकारचे माजी कारागृह मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आल्यानंतर धमक्यांचे प्रमाण वाढले आहे, असे सुकेशच्या वकिलाकडून न्यायालयात सांगण्यात आले आहे. आता सुकेशकडून करण्यात आलेल्या आरोपवर कारागृह प्रशासन काय उत्तर सादर करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचलंत का ?