Gujarat Election : बंडखोरी केलेले भाजपचे ७ नेते पक्षातून निलंबित | पुढारी

Gujarat Election : बंडखोरी केलेले भाजपचे ७ नेते पक्षातून निलंबित

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी Gujarat Election सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. १ डिसेंबर रोजी ८९ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने जोरदार प्रचार सुरू केला आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडू लागला आहे. सर्वच पक्षांचे बंडखोर नेतेही स्वतंत्रपणे रिंगणात उतरले आहेत.

दरम्यान, भाजपने Gujarat Election बंडखोरी केलेल्या नेत्यांना निलंबित केले आहे. या आमदारांमध्ये नर्मदा जिल्ह्यातील नांदोड येथील हर्षद वसावा, जुनागढमधील केशोद येथील अरविंद लडानी, सुरेंद्रनगरमधील छत्रसिंह गुंजारिया, वलसाड येथील केतन भाई पटेल, राजकोट ग्रामीणमधून भरत भाई चावडा, गीर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळ येथील उदय शहा आणि अमरेली येथील करण भाई बरैया यांचा समावेश आहे.

सत्ताधारी भाजपचे नेते मावजी देसाई यांना धानेरा मतदारसंघातून उमेदवारी न दिल्याने त्यांनी बुधवारी समर्थकांची बैठक घेऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली. गुरुवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. टर्नकोटचे धवलसिंह यांना भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनीही पक्षाविरोधात बंड करून बयाड मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. वाघोडियाचे विद्यमान आमदार मधु श्रीवास्तव अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत.

काँग्रेसमध्येही नेत्यांनी बंडखोरी केली आहे. पेटलाडचे आमदार निरंजन पटेल यांनी तिकीट नाकारल्यामुळे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांचे पुत्र महेंद्रसिंह यांना उमेदवारी देण्याच्या पक्षाच्या निर्णयावर नाराज असलेले बयाडचे आमदार जसुभाई पटेल यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे सांगितले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button