नागपूर, पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांचा अपमान महाराष्ट्रच नव्हे तर हिंदुस्थान कदापि सहन करणार नाही. राहुल गांधी यांना सावरकरांची ओळख तरी आहे का? असा इशारा भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात गुरुवारी भाजपने तीव्र आंदोलन केले. राहुल गांधी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांशी पोलिसांची बराच वेळ झटापट सुरू असल्याने वातावरण तापले.
महाल गांधीगेट टिळक पुतळा परिसरात शिवानी दाणी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येत युवक हजर होते. राज्यात सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात आहे. श्रीक्षेत्र शेगाव येथील जाहीर सभेपुर्वीच वीर सावरकर यांचे विरोधातील राहुल गांधी यांच्या वक्तव्याने राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपमधीलच काही नेत्यांनी ही यात्रा थांबविण्याची मागणी केली तर देशासाठी ही यात्रा चुकीची असल्यास थांबवूनच दाखवावी, असे आव्हान राहुल गांधी यांनी सरकारला दिले आहे.
दरम्यान, यात्रेची लोकप्रियता डोळ्यात सलत असल्यानेच रोज नवा वाद राज्यात सुरू असल्याचे काँग्रेसचे मत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी नागपुरात आलेल्या भाजप महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात या आंदोलनाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या संतापाला वाट मोकळी करुन दिली. अर्थातच भाजप काँग्रेसची शहर कार्यालये एकाच महाल भागात असल्याने पोलिसांनीही खबरदारी म्हणून वेळीच यात हस्तक्षेप केल्याचे पहायला मिळाले.