LPG Cylinder | गॅस सिलिंडरवर आता QR कोड, फसवणुकीला बसणार चाप, जाणून घ्या कसे? | पुढारी

LPG Cylinder | गॅस सिलिंडरवर आता QR कोड, फसवणुकीला बसणार चाप, जाणून घ्या कसे?

LPG Cylinder : अनेकदा कमी वजनाचे गॅस सिलिंडर दिले जातात. याचा फटका ग्राहकांना बसतो. पण आता याला चाप बसणार आहे. कारण आता LPG गॅस सिलिंडरवर QR कोड (QR Code) असणार आहे. यात सिलिंडरचे वजन आणि एक्सपायरीसह संपूर्ण माहिती असेल. ३ महिन्यांत ही सुविधा सुरु होणार आहे. लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) सिलिंडर लवकरच QR कोडसह येतील. जे घरगुती सिलिंडरचे नियमन करण्यास मदत करतील, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बुधवारी दिली.

“हा QR कोड सिलिंडरवर पेस्ट केला जाईल आणि तो नवीन सिलिंडरवर वेल्डेड केला जाईल. हा QR कोड सक्रिय केल्यावर त्यात गॅस सिलिंडर चोरी, ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग आणि चांगल्या इन्व्हेंटरी मॅनेजमेंटच्या अनेक विद्यमान समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता आहे,” असे पेट्रोलियम मंत्र्यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

लाइव्ह हिंदुस्तानने देखील याबाबत वृत्त दिले आहे. पहिल्या बॅचचे २० हजार एलपीजी सिलिंडर QR कोडसह जारी केले गेले आहेत तर पुढील काही महिन्यांत सर्व १४.२ किलो वजनाचे घरगुती सिलिंडर QR कोडसह येतील, असे वृत्तात म्हटले आहे.

नव्या आणि जुन्या सिलिंडरवर असेल QR कोड

QR कोड नवीन आणि जुन्या अशा दोन्ही सिलिंडरवर असणार आहे. QR कोडच्या मदतीने घरगुती एलपीजी ग्राहकांना त्यांच्या घरात आणलेल्या एलपीजी सिलिंडरचे बॉटलिंग कोणत्या प्लांटमध्ये झाले आहे याची माहिती मिळणार आहे. त्याचा वितरक कोण आहे. इंडियन ऑइलचे म्हणणे आहे की QR Code हे एकप्रकारचे LPG सिलिंडरचे आधार कार्ड आहे.

घरगुती वापराचे LPG सिलिंडर BIS ३१९६ मानकाच्या आधारावर बनवले जातात. या सिलिंडरच्या वापराचा कालावधी १५ वर्षे असतो. या कालावधीत सिलिंडरची दोनवेळा तपासणी केली जाते. पहिली तपासणी ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर केली जाते. दुसरी तपासणी १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर केली जाते. देशात सुमारे ३० कोटी घरगुती एलपीजी ग्राहक आहेत. एकट्या इंडियन ऑइल कार्पोरेशनचे (Indian Oil Corporation Limited) १५ कोटी ग्राहक आहेत. ३० कोटी पैकी ५० टक्के ग्राहकांकडे दोन सिलिंडर आहेत.

हे ही वाचा :

 

Back to top button