Gujarat Election : तिकीट नाकारलेल्या ५ नेत्यांनी भाजपला दिली निवडणूक लढवण्याची धमकी | पुढारी

Gujarat Election : तिकीट नाकारलेल्या ५ नेत्यांनी भाजपला दिली निवडणूक लढवण्याची धमकी

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Election) भाजपने तिकीट नाकारलेल्या पक्षाच्या  विद्यमान आमदार आणि चार माजी आमदारांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची धमकी दिली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पक्षातील काही नाराज नेत्यांनी त्यांच्या समर्थकांशी सल्लामसलत करून पुढचे पाऊल उचलणार असल्याचे सांगितले. मात्र, भाजपचे माजी आमदार हर्षद वसावा यांनी शुक्रवारी नांदोड (एसटी राखीव) जागेवरून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

Gujarat Election : हर्षद वसावा हे भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष आहेत. २००२ ते २००७ आणि २००७ ते २०१२ या काळात त्यांनी पूर्वीच्या राजपिपला जागेचे प्रतिनिधित्व केले होते. नर्मदा जिल्ह्यातील नांदोड ही जागा सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. या जागेवरून भाजपने डॉ. दर्शन देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या हर्षद वसावा यांनी भाजपमधील आपल्या पदाचा राजीनामा देत शुक्रवारी नांदोड जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

वाघोडियाचे सहा वेळा आमदार राहिलेले मधु श्रीवास्तव यांनी तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांशी चर्चा करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. या जागेवर भाजपने अश्विन पटेल यांना उमेदवारी दिली आहे. वडोदरा जिल्ह्यातील पदरा मतदारसंघातील भाजपचे आणखी एक माजी आमदार दिनेश पटेल उर्फ ​​दिनू मामा यांनीही आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे. या जागेवरून भाजपने चैतन्यसिंह जाला यांना तिकीट दिले आहे. ही जागा काँग्रेसच्या ताब्यात आहे.

कर्जणमधील भाजपचे माजी आमदार सतीश पटेल हे विद्यमान आमदार अक्षय पटेल यांना तिकीट देण्याच्या निर्णयावर नाराज आहेत. दरम्यान, भाजपचे राज्य सरचिटणीस भार्गव भट्ट आणि गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी शनिवारी वडोदरा येथे जाऊन स्थानिक कार्यकर्त्यांची भेट घेतली. वडोदरातील सर्व जागा भाजप जिंकेल, असा विश्वास भट्ट यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, जुनागडच्या केशोद मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार अरविंद लडाणी यांनी शनिवारी विद्यमान आमदार देवभाई मालम यांना पक्षाने तिकीट दिल्यानंतर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. भाजपने आतापर्यंत एकूण १८२ विधानसभा मतदारसंघांपैकी १६६ मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button