Sukesh Chandrashekhar | महाठग सुकेशचा आणखी लेटरबॉम्ब, केजरीवालांनी तिकीटासाठी ५०० कोटी आणायला लावले | पुढारी

Sukesh Chandrashekhar | महाठग सुकेशचा आणखी लेटरबॉम्ब, केजरीवालांनी तिकीटासाठी ५०० कोटी आणायला लावले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर यांचे आणखी पत्र समोर आले आहे.पत्रातून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. फसवणुकीच्या प्रकरणात तिहार तुरुंगात असलेल्या सुकेशने दिल्लीच्या नायब राज्यपालांना लिहलेल्या या पत्रातून केजरीवालांनी राज्यसभेवर पाठवण्याची बतावणी करीत ५० कोटी घेतल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.

कर्नाटकमध्ये पक्षाचे मोठे पद देण्याचे आमिष दाखवून केजरीवाल यांनी व्यापाऱ्यांकडून पक्षासाठी ५०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते. दिल्लीचे मंत्री कैलाश गहलोत यांच्या असोला फार्मवर ५० कोटी दिल्यानंतर २०१६ मध्ये हैद्राबादमधील हॉटेल हयातमध्ये आयोजित डिनर पार्टीमध्ये केजरीवाल सत्येंद्र जैन यांच्यासह उपस्थित राहीले होते,असा आरोप देखील सुकेश याने केला आहे.

तिहार तुरूंगात असताना २०१७ मध्ये सत्येंद्र जैन यांच्या काळ्या रंगाच्या आयफोनवरून केजरीवाल यांनी फोन केला होता. हा फोन क्रमांक जैन यांच्या मोबईलमध्ये एके-२ नावाने सेव्ह केला होता,असा आरोपही सुकेशने केला आहे. केजरीवाल आणि जैन यांच्याविरोधात लिहलेल्या पहिल्या पत्रानंतर तिहाडचे माजी डीजी तसेच त्यांच्या प्रशासनाकडून जैन यांच्या सांगण्यावरून धमक्या दिल्या जात आहेत.माझ्याकडून देण्यात आलेल्या माहितीची चौकशी करण्याचे आवाहन देखील सुकेशने केले आहे.

अलीकडेच सुकेशने नायब राज्यपालांना पत्र लिहित ‘आप’ सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आप नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना ‘प्रोटेक्शन मनी’ म्हणून १० कोटी रुपये दिल्याचा दावा घोटाळेबाज सुकेशने दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना पाठविलेल्या पत्रात केला होता.

या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी देखील सुकेशने सक्सेना यांच्याकडे केली आहे. मागील काही वर्षांपासून सुकेश तुरुंगात बंद आहे, तुरुंगातूनच त्याने उपराज्यपाल सक्सेना यांना पत्र लिहिले आहे. सत्येंद्र जैन यांनी वारंवार पैसे देण्यासाठी मला भाग पाडले, असे सांगून सुकेश पत्रात पुढे म्हणतो की, केवळ दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत सुकेशने १० कोटी रुपये माझ्याकडून वसूल केले. कोलकाता येथील जैन यांचे निकटवर्तीय चतुर्वेदी याच्यामार्फत हा पैसा वसूल करण्यात आला.

गेल्या ३ वर्षांपासून सत्येंद्र जैन तिहार तुरुंगात बंद आहेत. मात्र, त्यांनी तुरुंग खात्याच्या महासंचालकामार्फत मला धमकावले. उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला गेला. मला धमकी देण्यात आली, असेही सुकेशने पत्रात नमूद केले आहे. २०१७ साली मला अटक करण्यात आली होती. जैन त्यावेळी तुरुंग खात्याचे मंत्री होते. कित्येकदा तुरुंगात येऊन त्यांनी पैसे दिल्याचे कोणाला सांगू नको, अशा शब्दांत धमकावले होते, असा दावाही सुकेशने केला आहे.

दरम्यान, सुकेशला (Sukesh Chandrashekhar) तुरुंगात मदत केल्याचा गंभीर आरोप झालेले तिहारचे पोलीस महासंचालक संदीप गोयल यांची केंद्र सरकारने बदली केली आहे. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्या शिफारशीनुसार ही बदली करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

Back to top button