‘भारत माता की जय’चा नारा दिल्याने विद्यार्थ्याला शिक्षा : दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा | पुढारी

'भारत माता की जय'चा नारा दिल्याने विद्यार्थ्याला शिक्षा : दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील गुना येथील एका विद्यार्थ्याने ‘भारत माता की जय’चा नारा दिल्याने त्याला दोन शिक्षकांनी शिक्षा केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेबाहेर निदर्शने केली. तर याप्रकरणी दोन शिक्षकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

शिक्षा करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांने असा आरोप केला आहे की, ‘राष्ट्रगीतानंतर मी ‘भारत माता की जय’चा नारा दिला. यानंतर एका शिक्षकाने माझी कॉलर पकडली. मला बाहेर काढले आणि मुख्याध्यापकांकडे जाण्यास सांगितले. तसेच वर्ग शिक्षकाने मला सांगितले की, हे घोषवाक्य शाळेत नाही. तर घरी म्हणायचे. याशिवाय त्यांनी मला बराच वेळा खाली जमिनीवर बसवले.

याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे की, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे. जस्मिन खातून आणि जस्टिन या शिक्षकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे, पोलीस दोषींवर कारवाई करतील. त्याचबरोबर या प्रकारावर शाळेच्या वतीने माफी मागितली आहे.

दरम्यान, शाळेचे मुख्याध्यापक फादर थॉमस यांनी सांगितले की, विद्यार्थी राष्ट्रगीत झाल्यानंतर कर्णधार आणि उपकर्णधार निवडण्यासाठी एका बैठकीसाठी जात होते. तेव्हा एका विद्यार्थ्याने ‘भारत माता की जय’ अशी घोषणाबाजी केली. ही घोषणा त्यांनी देशभक्ती म्हणून नव्हे, तर विनोद म्हणून केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आम्ही शिस्तपालन समितीची बैठक तातडीने बोलावली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button