बैतूल (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील (Madhya Pradesh Road Accident) झल्लार येथे शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात ११ जण ठार झाले. भरधाव कारने बसला धडक दिल्याने हा अपघात झाला. यात कारमधील ११ जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये ५ पुरूष, ४ महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. झल्लार पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती बैतुलचे पोलीस अधीक्षक सिमाला प्रसाद यांनी दिली आहे. एका जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील सर्वजण अमरावती येथून आपल्या घरी परतत होते. कारचालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार समोरुन येणाऱ्या बसला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच बैतूलचे जिल्हाधिकारी आणि एसपीसह अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात बैतूल परतवाडा मार्गावर झल्लार गावाजवळ मध्यरात्री २ वाजता झाला. बैतूलचे पोलीस अधीक्षक सिमाला प्रसाद या घटनेविषयी माहिती देताना सांगितले की, झल्लार भागात बस क्रमांक एमपी ४८ पी ०१९३ आणि तवेरा कार यांच्यात धडक झाली. कारमधील सर्वजण मजूर होते. हे सर्वजण महाराष्ट्रातील कलम्भा येथून त्यांच्या गावी परतत होते. (Madhya Pradesh Road Accident)
पंतप्रधान मोदी यांनी बैतूलमध्ये झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
हे ही वाचा :