IFFI : गोव्यातील ‘इफ्फि’त झळकणार कोल्हापूरच्या प्रशांत सुतारचे पोस्टर | पुढारी

IFFI : गोव्यातील 'इफ्फि'त झळकणार कोल्हापूरच्या प्रशांत सुतारचे पोस्टर

पुढारी ऑनलाईन : २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात संपन्न होणाऱ्या ५३ व्या इफ्फि ( IFFI ) अर्थात, भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या ‘वन अँड ओन्ली रे’ या पोस्टर डिझाईन स्पर्धेत प्रशांत सुतार या कोल्हापुरातील तरुण कलाकाराचे पोस्टर निवडण्यात आले असून ते ‘इफ्फी’ दरम्यान झळकणार आहे. संपूर्ण भारतातून एकूण ७५ पोस्टर्स निवडण्यात आली आहेत.

सत्यजित राय यांच्या किंवा त्यांच्यावर बनलेल्या कोणत्याही चित्रपट, लघुपट आणि माहितीपटाचे पोस्टर बनवण्याची ‘वन अँड ओन्ली रे’ ही स्पर्धा होती. प्रशांत सुतार याने ‘शतरंज के खिलाडी’ या १९७७ साली सत्यजित राय यांनी बनवलेल्या हिंदी सिनेमाचे पोस्टर केले होते. हा सिनेमा प्रेमचंद यांच्या कथेवर आधारित आहे. यात संजीव कुमार, सईद जाफरी, शबाना आझमी, फरीदा जलाल, अमजद खान, रिचर्ड अटेनबरो यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हे पोस्टर करत असताना प्रशांत याने ‘शतरंज के खिलाडी’ या सिनेमातील शीर्षकी व्यक्तिरेखांचे ‘बुद्धिबळ वेड’ अधोरेखीत केले आहे. याशिवाय संपूर्ण सिनेमाच्या आशयसूत्राचे कंगोरेही अगदी तरल कलात्मकतेने पकडले आहेत. फाइन आर्टस् पार्श्वभूमी असलेल्या प्रशांतची ‘सेव्हन सेकंदस कलेक्टिव्ह’ ही फर्म असून त्या माध्यमांतून लघुपट, माहितीपट, पेंटिंग्ज आदी निर्मिती नियमितपणे सुरु असते. ( IFFI )

हेही वाचलंत का? 

Back to top button