नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवरील 'राजा शिवछत्रपती' या हिंदी महानाट्याचे थाटात उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांच्या हस्ते या महानाट्याचा शुभारंभ करण्यात आला. ६ नोव्हेंबरपर्यंत आयोजित या महानाट्याच्या निमित्ताने लाखो दिल्लीकरांना छत्रपतींचा गौरवशाली इतिहास जवळून बघण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय तसेच दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून दिल्लीकरांना नि:शुल्क हे महानाट्य बघता येईल. विदेशी राजदूतांना देखील नाटक बघण्यासाठी विशेष आमंत्रित करण्यात आले आहे. जवळपास ५ हजार विदेशी पाहुणे हे नाटक बघतील. त्यासाठी नाटकाच्या इंग्रजी अनुवादाची सोय करण्यात आली आहे.
दिल्लीतील विविध शाळांमधील विद्यार्थीदेखील हे महानाट्य पाहण्यासाठी येणार आहेत. यापूर्वी देखील २०१८ मध्ये पहिल्यांदा लालकिल्लात या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त या महानाट्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक तसेच दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी वैभव डांगे यांनी 'दैनिक पुढारी' सोबत बोलताना दिली.
हेही वाचा :