Air In Delhi : दिल्लीतील हवा जीवघेणी; तर नोएडातील गंभीर श्रेणीत | पुढारी

Air In Delhi : दिल्लीतील हवा जीवघेणी; तर नोएडातील गंभीर श्रेणीत

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिवाळीनंतर दिल्लीकरांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. वायू गुणवत्तेत (Air In Delhi) होणारी घट चिंतेचा विषय ठरत आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वायू गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत तर, राजधानी लगत असलेल्या नोएडातील हवा गंभीर श्रेणीत पोहचली आहे. मंगळवारी सकाळी दिल्लीतील वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सरासरी ३५९ नोंदवण्यात आला. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीआर) नोएडात एक्यूआय ४४४, तर गुरूग्राममध्ये ३९१ या अत्यंत खराब श्रेणीत नोंदवण्यात आला. शहरातील एक्युआयमध्ये गेल्या काही काळात कुठलीही सुधारणा दिसून आली नाही. उद्या, बुधवारी २ नोव्हेंबरला गुरूग्राममधील एक्यूआय गंभीर श्रेणीत पोहचण्याची तर नोएडातील एक्युआयमध्ये ही घट होण्याची शक्यता आहे.

उत्तर पश्चिम दिल्लीतील (Air In Delhi )नरेलामध्ये एक्यूआय सर्वाधिक ५७१ नोंदवण्यात आला. उत्तर दिल्लीतील एक्यूआय सध्या अत्यंत श्रेणीत पोहोचला आहे. जवळपास सर्वच स्टेशनवर एक्यूआय ४०० हून अधिक नोंदवण्यात आला आहे. मध्य दिल्लीत एक्यूआय ३०० च्या वर नोंदवण्यात आला. ‘सफर’च्या आकडेवारीनुसार मॉडल टाऊनच्या धीरपूरमध्ये एक्यूआय ४९४ नोंदवण्यात आला. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ३ वरचा एक्यूआय मंगळवारी सकाळी ३३२ ‘अत्यंत खराब’ श्रेणीत नोंदवण्यात आला.

दरम्यान, भाजपने वाढत्या प्रदूषणाला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दोषी ठरवले आहे. भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी मंगळवारी सकाळी ट्विट करीत केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. यंदा पंजाबमध्ये शेतातील पाचट जाळण्याच्या प्रमाणात ३३.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर हरियाणात ३३ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. एक्यूआय ५०० हून अधिक असल्याने पूनावाला यांनी चिंता व्यक्त करीत पंजाबमध्ये पाचट जाळण्याच्या घटनेत आणि वाहनांच्या प्रदूषणावर आळा घालण्यात अपयशी ठरलेले पंजाबचे पार्ट टाईम मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला गॅस चेंबर बनवले आहे, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button