कलम २७९ : रस्ते अपघातात पाळीव प्राण्याचा मृत्यू हा गुन्हा नाही – कर्नाटक उच्च न्यायालय | पुढारी

कलम २७९ : रस्ते अपघातात पाळीव प्राण्याचा मृत्यू हा गुन्हा नाही - कर्नाटक उच्च न्यायालय

रस्ते अपघातात पाळीव प्राण्याचा मृत्यू हा गुन्हा नाही - कर्नाटक उच्च न्यायालय

पुढारी ऑनलाईन – रस्ते अपघातात पाळीव प्राण्याचा मृत्यू झाला तर असेल संबंधित वाहनचालकावर बेदरकारपणे वाहन चालवल्याचा गुन्हा नोंद होऊ शकत नाही, असा महत्त्वाचा निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. भारतीय दंडसंहितेतील कलम २७९ आणि मोटर व्हेइकल अॅक्ट मधील तरतुदी या माणसांशी संबंधित आहेत, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. (HC on Section 279)

न्यायमूर्ती सुरज गोविंदराज यांनी हा निकाल दिला आहे. भारतीय दंड संहितेतील कलम २७९ हे फक्त माणसांना लागू आहे. हे कलम पाळीव प्राणी जखमी झाला किंवा त्याचा मृत्यू झाला तर लागू होत नाही. त्यामुळे या कलमानुसार गुन्हा नोंद होऊ शकत नाही. जर हा कायदा प्राण्यांना लागू केला तर पुढे जाऊन कलम ३०२नुसार खुनाचे गुन्हेही नोंद होतील. भारतीय दंड संहितेचा हेतू नाही, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.

यानुसार मोटर व्हेईकल कायद्यातील कलम १३४ही फक्त माणूस जखमी झाला तरच लागू होते, असे त्यांनी म्हटले आहे.
तर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२८ आणि ४२९ मधील तरतुदी या प्राणीहत्येशी संबंधित आहेत, पण तसा हेतू सिद्ध झाला पाहिजे, असे न्यायायलाने म्हटले आहे.

२४ फेब्रुवारी २०१८ला हा गुन्हा नोंद झाला होता. एक महिला रस्त्यावर कुत्र्याला फिरवत होती. या कुत्र्याला एक कार धडकली आणि यात या कुत्र्याचा मृत्यू झाला. यानंतर विजयनगर पोलिस ठाण्यात वाहन चालकावर कलम २७९, ४२८ आणि ४२९ आणि मोटर व्हेईकल अॅक्ट १३४ आणि १८७नुसार गुन्हा नोंद झाला आणि दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले. या वाहनचालकाने या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

हेही वाचा

 

Back to top button