वेळेच्या आतच पगार संपतोय? | पुढारी

वेळेच्या आतच पगार संपतोय?

महागाई आणि वाढता दैनंदिन खर्च पाहता बहुतांश मंडळींना वेतन अपुरे पडते. महत्त्वाची मासिक बिले भरण्याच्या आतच काहीवेळा सॅलरी अकाऊंटचे बॅलन्स कमी झाल्याचा अनुभव येतो. अशा वेळी ‘पे-डे लोन’ सुविधा मदत करू शकते.

‘पे-डे लोन’च्या माध्यमातून थकीत बिलाचा भरणा करू शकतो आणि पुढील वेतन जमा झाल्यानंतर ‘पे-डे लोन’ फेडता येऊ शकते. हे एक उच्च रकमेचे असुरक्षित कर्ज समजले जाते.

कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे आपण एखादेवेळी आर्थिक अडचणीत असाल आणि त्यासाठी पैशाची सोय करताना तारांबळ उडत असेल तसेच वैयक्तिक कर्ज घेण्यास पात्र नसाल, तर आपण ‘पे-डे लोन’चा विचार करू शकता. हा एक कर्जाचा किरकोळ प्रकार असून, त्याची परतफेड पुढील महिन्याच्या पगारापर्यंत करता येऊ शकते. साधारणपणे कर्ज घेतल्यानंतर दोन ते चार आठवड्यांतच त्याचा भरणा करावा लागतो. हे एक हायकॉस्ट अनसिक्यूर्ड लोन असून ते थोड्या काळाकरता घेता येते. अशा प्रकारचे कर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे मिळते.

या कर्जाची फेड पुढील पेमेंट डेटवर करू शकता. काहीवेळा विशेषत: खासगी क्षेत्रातील नोकरदारांचे वेतन लवकर जमा न झाल्यास किंवा लवकर खर्च झाल्यास नियमित बिल भरण्यास अडचण येऊ शकते. अशा वेळी ‘पे-डे’ कर्जाच्या सुविधेचा लाभ घेत बिल भरण्याबरोबरच अन्य घरखर्च भागवता येतो. अर्थात हे कर्ज उच्च व्याजदरासह दिले जाते. तरीही अनेक ग्राहक गरजेमुळे जादा व्याजदराचे कर्ज घेतात. यामागचे आणखी एक कारण म्हणजे या कर्जासाठी ग्राहकाला कोणत्याही प्रकारच्या कॉलेटरल आणि गॅरेंटरची आवश्यकता नाही.

* ‘पे-डे’ कर्जाची वैशिष्ट्ये

‘पे-डे’ कर्जासाठी अर्ज करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
या योजनेनुसार ग्राहकांना कमी रक्कम कमी कालावधीसाठी दिली जाते.
कर्जाची रक्कम सॅलरी पेमेंट होईपर्यंतच्या तारखेपर्यंत फेडता येऊ शकते.
लोन री-पेमेंटसाठी दोन ते चार आठवड्यापर्यंतचा वेळ दिला जातो.
कर्ज देणारी कंपनी कालावधीच्या नियमांची माहिती देतात.
अशा प्रकारचे कर्ज ग्राहकांच्या खात्यात तत्काळ जमा होते.
पे-डे लोनतंर्गत कर्ज देणार्‍या कंपन्या ग्राहकांच्या क्रेडिट हिस्ट्रीकडे लक्ष देत नाहीत.
अनसिक्यूर्ड कर्ज असल्याने कर्जदाराला सामान गहाण ठेवावे लागत नाही.

* पात्रतेचे निकष

कर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असणे गरजेचे आहे.
ग्राहक भारतीय नागरिक असावा.
ग्राहकाकडे नियमित उत्पन्नाचे स्रोत असणे आवश्यक.
करंट खाते सक्रिय असणे गरजेचे.

* आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना. रहिवासी प्रमाणपत्र, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, कंपनीकडील ऑफर लेटर, पासपोर्ट आकाराचा फोटो.

* असा करा अर्ज

पे-डे लोन कर्ज देणार्‍या कंपन्यांच्या किंवा बँकांच्या कार्यालयात ऑफलाईन अर्ज भरावा किंवा ऑनलाईनवर देखील अर्ज भरता येतो.
अर्जातील विवरण काळजीपूर्वक भरावे.
कर्जदारांनी आर्थिक कंपनीला हवी असलेली कागदपत्रे जमा करावीत.
कर्ज मंजूर झाल्यानंतर आर्थिक कंपनीला अन्य महत्त्वाची कागदपत्र सादर करावीत.
सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर कर्जाची रक्कम अर्जदाराच्या खात्यात जमा केली जाईल.
सध्या कोटक महिंद्रा बँकेसारख्या काही बँकांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.
राधिका बिवलकर

Back to top button