गांधी कुटुंबियांशी संबंधित आणखी एका संस्थेवर कारवाईची शक्यता

गांधी कुटुंबियांशी संबंधित आणखी एका संस्थेवर कारवाईची शक्यता
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : गांधी कुटुंबियांशी संबंधित राजीव गांधी फाऊंडेशन तसेच राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या दोन संस्थांचा विदेशातून निधी प्राप्त करण्याबाबतचा 'एफसीआरए' परवाना केंद्र सरकारने रद्द केला आहे. विदेशी योगदान नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याचे सांगत सरकारने या संस्थांचा एफसीआरए परवाना रद्दबातल केला आहे. दरम्यान गांधी कुटुंबाशी संबंधितच इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टवर देखील कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वरील तिन्ही संस्थांनी आयकर कायदा, हवाला तसेच एफसीआरए कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याच्या संशयातून केंद्र सरकारने जुलै 2020 मध्ये चौकशीसाठी आंतर मंत्रालयीन समितीची स्थापना केली होती. समितीने दिलेल्या अहवालाचा आधार घेत राजीव गांधी फाऊंडेशन तसेच राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टचा एफसीआरए परवाना रद्द करण्यात आला आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या राजीव गांधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा असून, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, राहुल गांधी, प्रियांका गांधी – वधेरा, मोंटेकसिंग अहलुवालिया, सुमन दुबे, अशोक गांगुली हे ट्रस्टी आहेत.

शिक्षण, आरोग्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, महिला व बालविकास क्षेत्रात काम करण्याबरोबरच दिव्यांगाना मदत करण्याच्या उद्देशाने सन 1991 मध्ये राजीव गांधी फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली होती. एफसीआरए परवाना रद्द झाल्याने या फाऊंडेशनला आगामी काळात विदेशातून मदत घेता येणार नाही. विशेष म्हणजे चीनकडून मदत घेत असताना फाऊंडेशनने नियमांकडे डोळेझाक केल्याचा आरोप भाजपने काही वर्षांपूर्वी केला होता.

दरम्यान, भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी सरकारच्या कारवाईचे समर्थन केले आहे. 'विदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा जमा करुन त्याचा उपयोग गांधी कुटुंबियांच्या सोयी-सुविधांसाठी केला जावा' हाच उद्देश वरील संस्थांच्या स्थापनेमागे दिसून येतो, असे मालवीय म्हणाले. सरकारच्या ताज्या कारवाईनंतर गांधी कुटुंबांशी संबंधित संस्थांच्या कामकाजाची ईडी तसेच सीबीआयकडून चौकशी होण्याची शक्यता बळावली आहे.

राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्षपद देखील सोनिया गांधी यांच्याकडेच आहे. चीनसहित इतर देशांतून निधी प्राप्त केल्यानंतर आयकर परतावा दाखल करताना कागदपत्रांमध्ये गडबड केल्याचा गंभीर आरोप या संस्थेवर आहे. वर्ष 2002 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे ट्रस्टी म्हणून राहुल गांधी, अशोक गांगुली, बन्सी मेहता आणि दीप जोशी कार्यरत आहेत. देशातील वंचित लोकांना आणि त्यातही ग्रामीण भागातील लोकांसाठी विविध योजना राबविण्याच्या उद्देशाने सदर संस्थेची स्थापना करण्यात आली होती.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news