

पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेन, रशिया, जपान, चीन, किर्गीझस्तान आणि फिलीपिन्स या देशांप्रमाणे आता भारतातही वैद्यकीय शिक्षण मातृभाषेतून ('MBBS' in Hindi) मिळणार आहे. देशात त्याची सुरुवात मध्य प्रदेशातून होत आहे. राज्यातील 97 डॉक्टरांच्या चमूने चार महिन्यांत रात्रंदिवस काम करून इंग्रजी पुस्तकांचे हिंदीत भाषांतर केले आहे. रविवारी, 16 ऑक्टोबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रेड परेड ग्राउंडवर या पुस्तकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
मध्य प्रदेशाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी सांगितले की, एमपी आणि हिंदी तज्ज्ञांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी एमबीबीएस ('MBBS' in Hindi) प्रथम वर्षाच्या पुस्तकांची अनुवादित आवृत्ती तयार केली आहे. या संपूर्ण प्रकल्पाला 'मंदार' असे नाव देण्यात आले आहे. समुद्रमंथनात मंदार पर्वताच्या साहाय्याने ज्याप्रकारे अमृत काढले जाते, त्याची कल्पना मंदार या नावामागे होती. त्याचप्रमाणे इंग्रजी पुस्तकांचे हिंदीत भाषांतर झाले आहे. मंदारमधील डॉक्टर आणि तज्ज्ञांनी विचारमंथन करून पुस्तके तयार केली आहेत. मातृभाषेतून वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या जगात भारतही आता सामील झाला आहे, याचा आम्हाला आनंद आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावरून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला या कामाबाबत सुचना दिल्या होत्या. आम्ही 97 डॉक्टरांसह संगणक परिचालकांची टीम तयार केली. या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या तांत्रिक बाबी आणि भविष्यातील आव्हानांचीही काळजी घेण्यात आली आहे. हिंदीतील शब्दांचा अर्थ कळायला सोपे जाईल, अशा पद्धतीने अनुवादित करून ही पुस्तके तयार करण्यात आली आहेत.
ग्रामीण भागातून हिंदीतून शिक्षण घेऊन एमबीबीएसमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सहज वाचता आणि समजेल, अशा अनुवादात पुस्तके तयार करण्यात आली आहेत. एमबीबीएस प्रथम वर्षाची बायोकेमिस्ट्री, फिजिओलॉजी आणि अॅनाटॉमीची तीन पुस्तके देवनागरी लिपीत तयार करण्यात आली असून ज्यांचे शब्द हिंदीत उपलब्ध नाहीत, ते देवनागरीत लिहिण्यात आले आहेत.
मंत्री विश्वास सारंग म्हणाले, आधी आम्ही ही कल्पना केली होती की आम्ही गांधी मेडिकल कॉलेज, भोपाळ येथून याची सुरुवात करू. पण आता पुरेशा प्रमाणात पुस्तके तयार आहेत. आता राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हिंदीतून एमबीबीएसचे शिक्षण सुरू आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही एमबीबीएसचे शिक्षण हिंदीतून सुरू व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे.
अमित शहा रविवारी १६ ऑक्टोबर रोजी भोपाळ येथील लाल परेड मैदानावर वैद्यकीय अभ्यासाच्या हिंदीतील अनुवादित पुस्तकांचे प्रकाशन करतील. वैद्यकीय क्षेत्रातील 50 हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. भोपाळच्या शासकीय, खासगी वैद्यकीय, नर्सिंग, पॅरामेडिकल महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. इतर शहरातील वैद्यकीय विद्यार्थी या कार्यक्रमाशी ऑनलाईन जोडली जाणार आहेत.
अटल बिहारी वाजपेयी हिंदी विद्यापीठ भोपाळने नवीन शैक्षणिक धोरण येण्यापूर्वी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण हिंदीतून सुरू करण्याची घोषणा केली होती. विद्यापीठाने तीन भाषांमध्ये अभियांत्रिकी सुरू करताना, एमबीबीएस अभ्यासक्रम हिंदीमध्ये सुरू करण्यासाठी पावले उचलली. मात्र, त्यावेळी त्याला मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिली नव्हती. मध्य प्रदेश सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत घेतलेल्या पुढाकारामुळे विद्यापीठाने अल्प प्रमाणात घेतलेल्या पुढाकाराला यश आले आहे.
अभियांत्रिकी, वैद्यकीय शास्त्राच्या पुस्तकांमध्ये इंग्रजी भाषेचा अवघड शब्दसंग्रह असल्याने हिंदी माध्यमात शिकणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. आता अभियांत्रिकी आणि एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू झाल्याने हिंदी माध्यमात शिकणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना सोपे होणार आहे. हिंदी भाषेच्या संवर्धनाच्या दिशेने राज्य सरकारने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे.
हेही वाचलंत का ?