Gujarat assembly elections 2022 | गुजरातमधील निवडणुकीची घोषणा का थांबवली?; निवडणूक आयोगाने दिले कारण | पुढारी

Gujarat assembly elections 2022 | गुजरातमधील निवडणुकीची घोषणा का थांबवली?; निवडणूक आयोगाने दिले कारण

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची काल शुक्रवारी निवडणूक आयोगाने घोषणा केली. पण गुजरात ‍विधानसभा निवडणुकीची (Gujarat assembly elections 2022) अद्याप घोषणा झालेली नाही. दरम्यान, गुजरातमधील विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर केल्या जाणार असल्याचे समजते. गुजरातमध्ये मतदान एक किंवा दोन टप्प्यांत होईल. ही प्रक्रिया ४ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीसोबतच गुजरातमधील निवडणुकीची मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सूचित केले असल्याचे वृत्त द टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

हिमाचल प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा एकत्र केली जाईल, असे मानले जात होते. मात्र निवडणूक आयोगाने केवळ हिमाचलच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. १६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत निवडणूक आयोगाचे अधिकारी गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेणार आहे. यासाठी अधिकारीवर्ग गुजरातला जाणार आहे. आढावा बैठका संपल्यानंतर गुजरातच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गुजरात विधानसभेची मुदत पुढील वर्षी १८ फेब्रुवारी रोजी संपत आहे. पण अद्याप गुजरातमधील निवडणुकीची घोषणा केलेली नाही. पण हिमाचलच्या निकालांचा निवडणूक रणांगणात परिणाम होऊ नये म्हणून गुजरातमधील निवडणुका आधी घेतल्या जाणार असल्याचे सूत्रांनी पुढे म्हटले आहे. हिमाचलमध्ये आतापर्यंत भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत झाली आहे. असे असली तरी आम आदमी पक्षामुळे यावेळी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. (Gujarat assembly elections 2022)

२०१७ मध्ये निवडणूक आयोगाने १३ ऑक्टोबरला हिमाचल प्रदेश आणि २५ ऑक्टोबरला गुजरातच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. हिमाचलमध्ये ९ नोव्हेंबरला मतदान झाले होते, तर गुजरातमध्ये ९ आणि १४ डिसेंबरला असे दोन टप्प्यात मतदान झाले होते. मतमोजणी दोन्ही राज्यांत १८ डिसेंबर रोजी झाली होती.

हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला असून येत्या १२ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यात विधानसभेच्या एकूण ६८ जागा आहेत. गतवेळी म्हणजे २०१७ साली झालेल्या निवडणुकीत यातील ४४ जागा भाजपने तर २१ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. तीन जागा इतरांना गेल्या होत्या.

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना १७ ऑक्टोबर रोजी काढली जाईल. २५ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येतील तर २७ तारखेला अर्जांची छाननी केली जाणार आहे. २९ ऑक्टोबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. १२ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडेल आणि त्यानंतर ८ डिसेंबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. हिमाचल प्रदेशातील बहुतांश भाग डोंगराळ असल्याने विशेष परिस्थितीमध्ये मतदारांसाठी मतदानाकरिता वाहन व्यवस्था उपलब्ध केली जाणार आहे. याशिवाय ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, कोविड बाधित तसेच दिव्यांगांना घरातूनच आपले मत देण्याची सुविधा दिली जाणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.

हे ही वाचा :

Back to top button